बिजेपार : सध्या प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाची सदस्य संख्या कशी वाढेल यासाठी प्रयत्न करीत आहेत. कार्यकर्त्याच्या भरवशावर सत्ता प्राप्त करता येते. मान सन्मान, पद पैसा मिळविण्यात येतो. यासाठी पक्षाचे सदस्य जास्तीत जास्त कसे बनविता येतील याचे प्रयत्न आहेत. भाजप राजकीय पक्षांमध्ये हायटेक पद्धतीचा वापर करीत आहे. परंतु ज्यांना सदस्य बनविण्यात आले त्यांना आपण सदस्य झाल्याचे माहितच नसते, असा प्रकार सुरू आहे.काँग्रेस पक्ष जुन्याच पद्धतीने पावती काढून प्राथमिक सदस्य बनवित आहे. भाजपा मात्र एक टोल फ्री नंबर देते, त्यावर फक्त भ्रमणध्वनी वरुन एक मिसकॉल मारावा लागतो लगेच तिकडून एसएमएस येतो. माहिती टाकली की भाजपाचे सदस्यत्व प्राप्त होते. परंतु गावखेड्यात गुराख्यापासून मजूर, कामगार, शिक्षित, अशिक्षित या जवळ-जवळ सर्वच लोकांजवळ आजच्या घडीला प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. मग भाजपाचा एखादा कार्यकर्ता काका, मामा, बडे भैय्या म्हणून त्यांच्याजवळील मोबाईल मागतो. गावात सलोख्याचे व जवळचे संबंध असल्याने आपला मोबाईल देवून टाकतात व मग तो कार्यकर्ता लगेच टोल फ्री नंबरवर मिसकॉल देतो. मॅसेज येते त्याची माहिती न सांगता देवून टाकतो व आपण भाजपाचे सदस्य झाल्याचा एसएमएस येतो. जो सदस्य होतो त्यालाही आपण त्या पक्षाचा सदस्य बनलो याची माहिती नसते. मात्र आकडा जरुर वाढत जातो आणि या गावून, या तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून किती नवीन सभासद तयार करण्यात आले याचा आकडा फुगलेला दिसतो. असे प्रकार ग्रामीण भागात जोरात सुरू असल्याचे सांगितले जाते. (वार्ताहर)
हायटेक सदस्यता नोंदणीत गोंधळ
By admin | Updated: February 22, 2015 01:36 IST