सालेकसा : ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे वैद्यकीय व दंत शिबिराच्या कार्यक्रमाचा विधिवत शुभारंभ झाला असून, पहिल्याच दिवशी जवळपास ५०० रुग्णांनी शिबिराचा लाभ घेत आपली आरोग्य तपासणी करवून घेतली.
राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरत बहेकार होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका काँग्रेस अध्यक्ष वासुदेव चुटे, सुनील असाटी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.पी.एस.रामटेके व इतर मान्यवर उपस्थित होते. चार दिवस चालणाऱ्या आरोग्य शिबिरात सर्वसामान्य आजारासह हायड्रोसील, अपेन्डीक्स, शरीरावरील गाठी, दातांची शस्त्रक्रिया, डोळ्यांची शस्त्रक्रिया, गरोदर माताची तपासणी, बालकांची तपासणी व विविध आजारांवर मोफत औषधोपचार केला जाणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन आरती ठाकरे आणि सविता हुकरे यांनी केले. आभार उषा भट यांनी मानले. शिबिराचे प्रास्ताविक ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पी.एस.रामटेके यांनी मांडले. शिबिरात डॉ. राहुल सेवईवार, डॉ. भाग्यश्री बंसोड, डॉ. सुरेखा मानकर, सागर राठौड, खलील शेख, अजय वैद्य, सोनाली गव्हाणे, ममता तांडेकर,ममता वाढई यांनी सेवा दिली.