लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एका महिलेच्या विनयभंग प्रकरणात आरोपी संजय राधेश्याम गायधने (३३) रा. महाजनटोला, ता. गोरेगाव याला ४ वर्षे ६ महिने सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही सुनावणी प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांनी १७ सप्टेंबर रोजी केली आहे.
७ ऑक्टोबर २०२१ संबंधित महिला माहेरवरून परत आपल्या गावाकडे जात असताना कमरगाव बसस्टॉपवर बसमधून उतरून रस्त्याने जात होती. दुपारच्या उन्हामुळे ती झाडाखाली विसावली असता आरोपी संजय गायधने याने तिथे येऊन तिचा हात पकडून ओढाताण करून छेडछाड केली. तसेच शिवीगाळ व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत तक्रारीवरुन गोरेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३५४, ३५४ ब, ३२३, ५०९, ५०६ सहकलम ३(२) (व्हीए), ३ (डब्ल्यू) (आय) (आयआय) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकूल यांनी केला होता. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेश चंदवानी यांनी एकूण ७ साक्षीदार तपासले. सविस्तर युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील कृष्णा पारधी यांनी केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांच्या देखरेखीत सहाय्यक फौजदार प्रकाश शिरसे यांनी सहकार्य केले.
अशी सुनावली शिक्षा
न्यायालयाने आरोपीविरुद्ध शिक्षा ठोठावली. त्यात कलम ३५४ अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रूपये दंड, कलम ५०९ अंतर्गत १ वर्ष साधा कारावास व १ हजार रुपये दंड, कलम ५०६ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, कलम ३२३ अंतर्गत ६ महिने सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड असा एकूण ४ वर्षे ६ महिने सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.