सडक-अर्जुनी : जिल्ह्यात मग्रारोहयो अंतर्गत अनेक मामा तलावांच्या कामाचे खोलीकरण व गाळ काढण्याचे कामे सुरू आहेत. या अंतर्गत तालुक्यातील खोबा येथील झरणी तलावाच्या खोलीकरणाच्या कामावर १३ मे रोजी दुपारी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. यावेळी कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, मजुरांना सावलीची सोय, प्राथमिक उपचार पेटी या बाबतीत पाहणी करून मजुरांशी संवाद साधला. कामाचे अंदाजपत्रक व तांत्रिक बाबी तपासून लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी तलावाचे खोलीकरण किंवा गाळ काढण्याचे काम करीत असतांना कुठल्याही प्रकारे तलावांच्या मूळ रचनेला धक्का लागणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या कामासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. तांत्रिक बाबी संदर्भात पाहणी करण्याचे सांगितले. यावेळी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. सभापती कविता रंगारी, खंड विकास अधिकारी झामसिंग टेंभरे, सरपंच सिंधू मेश्राम, उपसरपंच उमराव कापगते, पं.स. सदस्य राजेश कठाणे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, उपविभागीय अभियंता देशमुख, शाखा अभियंता अगळे, वसंत गहाणे, कनिष्ठ अभियंता साखरे, ग्रामसेवक वाढई उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांनी केली तलावाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2016 02:01 IST