गोंदिया : २७ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात शाळेची घंटा वाजली. त्यातच जि. प. उच्च प्राथमिक शाळा कारंजा केंद्र नंगपुरा पं.स.गोंदिया येथे दहा महिन्यांपासून बंद असलेली शाळा मोठ्या उत्साहात सुरू झाली. शालेय परिसरात आनंदाला उधाण आले. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले असून शिक्षकांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
शासनाने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यात आले व त्याची नोंद घेण्यात आली. सामाजिक अंतर ठेवून प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात करण्यात आली. २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता गटशिक्षणाधिकारी जनार्दन राऊत, केंद्रप्रमुख के. आर. गोटेफोडे व सर्व समग्र शिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक बाळकृष्ण बिसेन यांनी शाळेला भेट देऊन पाहणी करुन विद्यार्थ्यांशी हितगूज केले. कारंजा शाळेत इयत्ता ५ ते ७ वीची एकूण पटसंख्या १५६ असून ११३ विद्यार्थी उपस्थित होते. त्यामध्ये एकूण ९ वर्ग तयार करून एका बाकावर एका विद्यार्थ्याला बसविण्यात आले. शाळा भेटीदरम्यान मुख्याध्यापक एल. यू. खोब्रागडे यांनी सविस्तर माहिती दिली. शाळेत एम. एम. चौरे, एम. टी. जैतवार, हेमंतकुमार रुद्रकार, के.जे. बिसेन, नरेश बडवाईक, संगीता निनावे, पूजा चौरसिया व वर्षा कोसरकर उपस्थित होते.