लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र आहे. कोरोना बाधितांची संख्या पुन्हा तीन आकडी होत असून सर्वाधिक रुग्ण हे गोंदिया तालुक्यात आढळत आहे. त्यामुळे हा तालुका पुन्हा कोरोनाचे हॉटस्पाट होत असल्याने शहरवासीयांसह जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.गुरुवारी (दि.१९) जिल्ह्यात १२५ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. गोंदिया, सडक अर्जुनी आणि तिरोडा तालुक्यातील तीन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ५१ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी आढळलेल्या १२५ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ७६ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ९, गोरेगाव ३, आमगाव १६, सालेकसा २, देवरी २, सडक अर्जुनी ११, अर्जुनी मोरगाव ५ आणि बाहेरील १ रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४२३९४ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ३२१५२ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. आतापर्यंत ४५१५६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ४०५०४ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १११४३ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी १०३१७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ६७८ कोरोना ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. ३३८ नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून अद्याप प्राप्त व्हायचा आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढविलेकोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेत आरोग्य विभागाने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. मागील दोन दिवसांपासून दररोज तीनशे ते चारशे कोरोना चाचण्या केल्या जात आहे. त्यामुळेच रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९६ टक्के कोरोना बाधितांच्या संख्येत मागील दोन तीन दिवसांपासून वाढ झाली असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८९.९६ टक्के आहे तर मृत्यू दर १.१९ टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा डब्लिंग दर १७८.८ टक्के आहे.