लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण २०२४ मध्ये गोंदिया नगरपरिषदेने यंदा देशात २७८, वा तर राज्यात १९९ वा क्रमांक पटकाविला आहे. यंदा मोहिमेत ५० हजार ते तीन लाख लोकसंख्या गटात गोंदिया नगरपरिषदेचा सहभाग होता.
स्वच्छ वातावरणातून निरोगी आरोग्यासह सकारात्मक विचारसरणी वाढते. यातूनच केंद्र शासनाने स्वच्छता अभियान सुरू केले असून, हे अभियान फक्त नगरपरिषद व शासकीय यंत्रणांपुरतेच मर्यादित राहू नये, तर त्यात नागरिकांचाही सहभाग असावा, यासाठी त्यांच्यातही स्वच्छतेबाबत भाव निर्माण केला जात आहे. यासाठी नगरपरिषदांना विविध घटक ठरवून देण्यात आले असून, त्यात नागरिकांचा सहभाग घेतला जात आहे.
यानंतर केलेल्या कामांची पावती देण्यासाठी स्वच्छता सर्वेक्षण करून शहरांना क्रमांक दिला जात आहे. यात यंदा ५० हजार ते तीन लाख लोकसंख्या असलेल्या गटात गोंदिया शहराचा समावेश करण्यात आला आहे. या स्वच्छता सर्वेक्षण-२०२४ मध्ये गोंदिया नगरपरिषदेने राज्यात १९९ वा, तर देशात २७८ वा क्रमांक पटकाविला आहे.
यांना मिळाला असा क्रमांक२० ते ५० हजार लोकसंख्या असलेल्या गटात तिरोडा नगरपरिषदेने राज्यात ११८ वा क्रमांक पटकाविला. देवरी नगरपंचायतीने राज्यात १६७, गोरेगाव नगरपंचायतीने १७०, सडक-अर्जुनी नगरपंचायतीने २९९, सालेकसा नगरपंचायतीने ३०५, आमगाव नगरपरिषदेने ३५२, तर अर्जुनी-मोरगाव नगरपंचायतीने ३६१ वा क्रमांक पटकाविला आहे.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प भोवलाशंभर वर्षाच्या नगरपरिषदेकडे आजही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने कचऱ्याची समस्या गंभीर असून यावर तोडगा म्हणून खासगी प्रकल्पासोबत करार करण्यात आला आहे. मात्र, नगरपरिषदेच्या मालकीचा प्रकल्प असल्यास ती बाब काही वेगळीच राहणार यात शंका नाही. नेमकी हीच बाब स्वच्छता सर्वेक्षणात नगरपरिषदेला दरवर्षी भोवत आली आहे.
असे मिळाले विविध घटकांना गुण
- एकूण १२ हजार ५०० गुण असलेल्या या सर्वेक्षणात विविध घटकांसाठी विविध गुण मर्यादा ठेवण्यात आली होती. यामध्ये गोंदिया नगरपरिषदेने गुण मिळविले असून त्याआधारे क्रमांक पटकाविला आहे.
- घनकचरा संकलनात नगरपरिषदेला ७६ टक्के, कचरा वर्गीकरणात ३१ टक्के, निर्माणाधीन कचऱ्यावर प्रक्रियेत १०० टक्के, सार्वजनिक रस्ते सफाईत १०० टक्के, जलाशय स्वच्छतामध्ये १०० टक्के, तर सार्वजनिक शौचालय सफाईमध्ये २५ टक्के गुण मिळाले असून अशाप्रकारे अन्य घटकांचा समावेश आहे.