स्वच्छ सर्वेक्षणात गोंदियाचा देशात 112 वा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 05:00 AM2021-11-21T05:00:00+5:302021-11-21T05:00:11+5:30

स्वच्छ वातावरणातून निरोगी आरोग्यासह सकारात्मक विचारसरणी वाढते. यातूनच केंद्र शासनाने स्वच्छता अभियान सुरू केले असून, हे अभियान फक्त नगर परिषद व शासकीय यंत्रणांपुरतेच मर्यादित राहू नये, तर त्यात नागरिकांचाही सहभाग असावा यासाठी त्यांच्यातही स्वच्छतेबाबत भाव निर्माण केला जात आहे. यासाठी नगर परिषदांना विविध घटक ठरवून देण्यात आले असून, त्यात नागरिकांचा सहभाग ही घेतला जात आहे. यानंतर केलेल्या कार्याची पावती देण्यासाठी स्वच्छता सर्वेक्षण करून शहरांना क्रमांक दिला जातो. 

Gondia ranks 112nd in the country in clean survey | स्वच्छ सर्वेक्षणात गोंदियाचा देशात 112 वा क्रमांक

स्वच्छ सर्वेक्षणात गोंदियाचा देशात 112 वा क्रमांक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ मध्ये गोंदिया शहर नगर परिषदेने देशातून ११२वा क्रमांक पटकाविला. विशेष म्हणजे, मागील वर्षी गोंदिया नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षणात १३५वा क्रमांक पटकाविला होता. यामुळे नगर परिषदेने यंदा चांगली कामगिरी केली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 
स्वच्छ वातावरणातून निरोगी आरोग्यासह सकारात्मक विचारसरणी वाढते. यातूनच केंद्र शासनाने स्वच्छता अभियान सुरू केले असून, हे अभियान फक्त नगर परिषद व शासकीय यंत्रणांपुरतेच मर्यादित राहू नये, तर त्यात नागरिकांचाही सहभाग असावा यासाठी त्यांच्यातही स्वच्छतेबाबत भाव निर्माण केला जात आहे. यासाठी नगर परिषदांना विविध घटक ठरवून देण्यात आले असून, त्यात नागरिकांचा सहभाग ही घेतला जात आहे. यानंतर केलेल्या कार्याची पावती देण्यासाठी स्वच्छता सर्वेक्षण करून शहरांना क्रमांक दिला जातो. 
त्यानुसार, स्वच्छता सर्वेक्षण-२०२१ मध्ये गोंदियाने ११२ वा क्रमांक पटकाविला आहे. यासाठी ठरवून दिलेल्या विभागातील ३७२ शहरांत गोंदिया हा क्रमांक पटकाविला आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी स्वच्छता सर्वेक्षणात गोंदिया १३५ व्या क्रमांकावर होता. मात्र यंदा ११२ वा क्रमांक पटकाविला असल्याने यंदा नगर परिषदेने नक्कीच चांगली कामगिरी केल्याचे दिसून येते. 

तर टॉप-५मध्ये राहणार 
गोंदिया नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी हक्काची जागा नसल्याने प्रकल्प उभा करता आलेला नाही. आता जागेसाठी प्रयत्न सुरू असून एकदा प्रकल्प उभा राहिल्यानंतर गोंदिया राज्यातील टॉप-५ मध्ये राहणार. 
- करण चव्हाण 
मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया

हे आहेत सर्वेक्षणातील घटक 
स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत ३ घटक असून ६००० गुण आहेत 

-  सर्टिफिकेशन :  १८०० गुणांच्या या घटकात हागणदारीमुक्त व कचरामुक्त यावर गुणांकन केले जाते. यामध्ये शहरात उघड्यावरील शौच, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, शहर स्वच्छता, बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी शौचालयाची स्वच्छता आदी मुद्दे असतात. यात  गोंदिया नगर परिषदेने ३०० गुण मिळविले आहेत. 
-  सिटिजन व्हॉइस : यामध्ये नगर परिषदेने केलेल्या कार्यांना घेऊन जनजागृती, लोकांची प्रतिक्रिया आदींचा समावेश असतो.  १८०० गुणांच्या या घटकात नगर परिषदेने १३३४.२७ गुण मिळविले आहेत. 
-  सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस : २४०० गुणांचा हा घटक असून यामध्ये नगर परिषदेने स्वच्छता अभियानांतर्गत केलेल्या कामांच्या कागदपत्रांची पूर्तता आदींचा समावेश असतो. यात नगर परिषदेने १५२९.३७ गुण मिळविले आहेत. 

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प भोवला 
-  शहरात स्वच्छतेसाठी नगर परिषदेकडून चांगलेच प्रयत्न केले जातात. मात्र नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्यामुळे नगर परिषद नेमकी येथेच कमी पडत आहे. हेच कारण आहे की, चांगली कामगिरी करूनही नगर परिषद घनकचरा प्रकल्प नसल्यामुळे कचरामुक्त प्रमाणीकरणात मागे राहते. यामुळेच नगर परिषदेला सर्टिफिकेशन या घटकात फक्त ३०० गुण मिळाले आहेत. यामुळेच नगर परिषदेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प भोवला असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

 

Web Title: Gondia ranks 112nd in the country in clean survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.