स्वच्छ गोंदियाचे स्वप्न धुळीस : न.प. प्रशासनाच्या उदासीनतेने गाठला कळसगोंदिया : गेल्या अनेक वर्षापासून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर वसलेल्या गोंदिया शहरवासियांसाठी ‘स्वच्छ आणि सुंदर गोंदिया’ हे अखेरपर्यंत स्वप्नच राहणार का? असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे. पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या निमित्ताने तरी गोंदियातील हे चित्र बदलेल अशी अपेक्षा सर्वांना आहे. मात्र नगर परिषद प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्वच्छ गोंदियाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणे तर दूर, त्या दृष्टीने प्रयत्नही होताना दिसत नाही, ही कटू सत्य गोंदियावासीयांना स्वीकारावे लागत आहे.दिवसभरात कोणत्याही वेळी फेरफटका मारला तरी शहराच्या अनेक भागात कचऱ्यांचे ढिगारे रस्त्याच्या कडेला साचल्याचे आणि नाल्या तुंबल्याचे चित्र कायम दिसून येते. त्यामुळे नगर परिषदेला स्वच्छता कर्मचारी आहेत की नाही असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. शहरातील रेल्वे स्थानकाबाहेर परिसर, प्रभू रोड, भाजीबाजार, बाई गंगाबाई रुग्णालयाबाहेरील परिसर, पोलीस ठाण्याच्या समोरील आणि मागील परिसर, तहसील कार्यालयाबाहेरील परिसर, नेहरू चौक, जयस्तंभ चौक, मूर्री रोड अशा कितीतरी भागातील नागरिक आणि व्यावसायिकांसाठी स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या भागात फेरफटका मारला तरी चार दिवसांपूर्वी टाकलेला कचरा तिथे तसाच पडून दिसतो. त्यामुळे स्वच्छता कर्मचारी नेमके करतात तरी काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.स्वच्छ भारत अभियानाचे सोडा, पण जिकडेतिकडे डासांचे उत्पत्ती झाली आहे. डेंग्यूसारख्या आजाराने शहरातही हातपाय पसरले आहे. तरीही नगर परिषदेला जाग का येत नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे. नागरिकांना स्वच्छतेचे महत्व कळत नाही, असे म्हणून अनेक वेळा नगर परिषद प्रशासन आपली जबाबदार झटकण्याचा प्रयत्न करीत असले तरी नगर परिषदेचे कर्मचारीही आपले कर्तव्य पार पाडत नाही हे कटूसत्य आहे. त्यांच्यावर नगर परिषद प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)
गोंदियात दिव्याखाली अंधार
By admin | Updated: November 13, 2014 23:03 IST