गोंदिया : श्रावणात मासात उपवास आणि भक्तीमय वातावरणात खवय्यांची चांगलीच अडचण होते. मात्र त्याला पर्याय ठरणाऱ्या आणि शुद्ध शाकाहारी असलेल्या भोंबोळीने (मशरूम) सध्या गोंदियात धूम केली आहे. चक्क ४०० रुपये किलो दर असतानाही खवय्यांकडून भोंबोळीची खरेदी केली जात आहे. पौष्टिक तत्वांनी भरपूर असणाऱ्या भोंबोळीची त्यामुळेच चांगली मागणी होत आहे.श्रावणात उपवासांमुळे मनाजोगे खाणाऱ्यांची अडचण निर्माण होते. परंतु विशिष्ट चव आणि पौष्टिकतेमुळे भोंबोळीची भाजी चविष्ट खाणाऱ्यांसाठी पर्याय असल्याचे खवय्ये मानतात. ही भाजी त्यांच्या जिभेचे चोचले पूर्ण करीत आहे. त्यामुळेच अधिक भावात या भोंबोळीची हातोहात विक्री होत असल्याचे येथे दिसून येत आहे. सध्या ४०० रूपये प्रतिकिलो दराने भोंबोळीची विक्री होत आहे. एवढी महाग असतानाही या वनस्पतीजन्य भाजीचे चाहते मात्र खुल्या दिलाने ती खरेदी करून पार्टी करीत आहेत. आकाशात वीजा कडाडल्या की, शेतशिवार व जंगलात भोंबोळी उगवते अशी ग्रामीण भागातील लोकांची मान्यता आहे. पांढऱ्या रंगाच्या शेंगासारख्या या भोंबोळीत अत्यंत पौष्टीक तत्व असल्याचे म्हटले जाते. गोंदियात महादेव मंदिराजवळील रस्त्याच्या कडेला भोंबोळी विक्रेत्यांची दुकाने सजतात. सकाळपासून विक्री करणाऱ्यांच्या अवती-भोवती लोकांची गर्दी नेहमी दिसून येते. केवळ पावसाळ्यातील काही मोजक्या दिवसातच जंगली भागात उगवणाऱ्या या वनस्पतीची भाजी वर्षातून एकदा तरी खावी असा सल्लाही जाणकार देतात. शहरात आज ४०० रूपये प्रति किलो दराने भोंबोळीची विक्री होत आहे. मनोहर चौकात भोंबोळी घेऊन ग्रामीण भागातील महिला दुकाने थाटत असल्याने येथे भोंबोळीच्या चाहत्यांची हमखास गर्दी दिसून येते. भाव कितीही असो, मात्र या महिलांकडील माल हमखास विकला जातो. असाही रोजचा अनुभव आहे. यावरूनच भोंबोळीच्या चाहत्यांचा अंदाज बांधता येतो. (शहर प्रतिनिधी)
जंगलातील भोंबोळीची गोंदियात धूम
By admin | Updated: August 12, 2014 23:51 IST