लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता देव पावला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २९० पदांची जाहिरात निघाल्याने आता फक्त वेळेवर परीक्षा व्हावी असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. निघालेल्या जागांसंदर्भात थोडा आनंद परंतु कमी जागा असल्याने नाराजीही व्यक्त होत आहे. स्पर्धा परीक्षेच्या नादी लागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वर्षातून किमान दोन वेळा परीक्षेची संधी देण्यात यावी, असा सूर उमटत आहे.कोरोनाचा संसर्ग, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण यामुळे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला घेऊन अनिश्चितता होती. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे वर्षभराचे वेळापत्रक जाहीर केले तर अभ्यास करणाऱ्यांना योग्य होईल असे मुलांना वाटत आहे. लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असल्याने हजारो जागा काढणे अपेक्षित आहे.
२९० पदांची जाहिरातमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत गट-अ च्या ७ तर गट- ब च्या १० संवर्गांसाठी जाहिरात काढण्यात आली. त्यात २९० पदे ब गटाची आहेत. त्यात ५४ पदे ही सरकारी कामगार अधिकारी या पदाची आहेत. १०० पदे ही गट अ ची असून सहायक कामगार आयुक्तांची सर्वाधिक २२ पदे आहेत.
२५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार- २ जानेवारी २०२२ रोजी राज्यसेवेची पूर्व परीक्षा ३७ जिल्हा केंद्रांवर होणार आहे. यासाठी ५ ते २५ ऑक्टाेबरपर्यंत करता येणार आहे.- राज्यसेवेची पूर्व परीक्षा २०२१ मार्फत २९० पदांच्या १७ संवर्गांत ही भरती केली जाणार आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे म्हणणे आहे.
वय निघून चालले, काय होणार?वर्षाकाठी दोन वेळा जाहिरात निघणे आवश्यक आहे. एकदा भरती झाल्यावर दोन-तीन वर्षे जागाच निघत नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची फौज खूप मोठी आहे. पण त्या तुलनेत जागाच निघत नाही.स्पर्धापरीक्षेच्या तारखा अनिश्चित राहत असल्याने तयारी करणारा विद्यार्थी निराशेच्या छायेत आहे. शासनाने झोपेचे सोंग घेऊ नये, शासन बोलते वेगळे आणि करते वेगळे. आयोगाने वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. ओबीसी आरक्षण असो किंवा मराठा आरक्षण असो त्यांचा मुद्दा तसाच पडून आहे. आधी ज्यांनी परीक्षा पास केल्या त्यांना नियुक्ती देण्यात आल्या नाही. दोन-तीन वर्षांत एकदा भरती निघते. अधिकारी होण्याच्या नादात तयारी करणाऱ्यांचे वय ओलांडत चालले आहे.
निघालेल्या जागांची संख्या आणि अभ्यास करणारे विद्यार्थी यांची संख्या पाहिल्यास कीव येते. कोणत्या ना कोणत्या कारणाने परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांत नाराजी आहे. विद्यार्थ्यांनीही इतर पर्याय निवडणे गरजेचे आहे.- राजकुमार हिवारे, मार्गदर्शक
नोकरीचा नाद करून स्पर्धा परीक्षेची तयारीच करणाऱ्या लोकांचे वय वाढत गेले आणि नोकरी हातात आली नाही तर त्यांच्या मनात नैराश्य येते. नैराश्य येऊ नये यासाठी योग्य वयातच योग्य कामाला सुरुवात करणे गरजेचे आहे.- झेड.डी. पठ्ठे, मार्गदर्शक