गोरेगाव : सध्या सोशल मीडियावर कोरोनाविषयी वेगवेगळ्या प्रकारचे बरेच मेसेज फिरत आहेत, योग्य माहितीअभावी खूप लोकसुद्धा दगावत आहेत. परिस्थिती खूप गंभीर आहे. भम्रात राहू नका, लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार घ्या, ताप आला, सर्दी झाली घरच्या घरी पॅरासिटॅमॅाल किंवा सर्दीची औषधी घेतली, असे करू नका वेळीच डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्या, असा सल्ला माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी दिला आहे.
आठ - नऊ दिवसानंतर वाट पाहून आपण स्वत:हून आपल्या शरीराची पूर्ण वाट लावलेली असते. या परिस्थितीत ॲाक्सिजन लेव्हल घटतच राहिली की पेशंट सिरिअस होतो. डॅाक्टरच्या हातातही आता जास्त काही राहत नाही. रुग्णाचा खर्चही खूप झालेला असतो व तरीही जिवाची काही हमी नसते. वाचलात तरी तुमचे फेफडे बऱ्याच अंशी कायमचे निकामी झालेले असतात. म्हणून पहिल्या दिवशीच लक्षणे दिसल्यास ताबडतोब आरटीपीसीआर टेस्ट करावी व पॅाझिटिव्ह आल्यास नजीकच्या कोविड केअर सेंटरमध्ये संपर्क करावा म्हणजे रुग्ण आठ ते दहा दिवसात बरा होतो. म्हणून कोणतेही लक्षण दिसल्यास लवकर आरटीपीसीआर टेस्ट करा यात घाबरण्याचे काही कारण नाही, लवकर निदान होणे हे सर्वात सोपा उपाय आहे. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची वेळच येऊ देऊ नका. शक्य असेल तेवढे दिवस घरी राहा, कोरोनासंबंधी सर्व निर्देशांचे कठोरतेने पालन करा हे दिवसपण जातील, सर्वांनी काळजी घ्या, असे नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी म्हटले आहे.