लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया :अन्न औषध प्रशासन भंडारा कार्यालयातर्फे सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत परवाना, नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा. ज्यांची वार्षिक उलाढाल १२ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनी परवाना घेणे आवश्यक आहे. ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल १२ लाखांच्या आत आहे, त्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी केले आहे.
जे अन्न व्यावसायिक विनापरवाना, विना नोंदणी अन्न व्यवसाय करताना आढळून येतील, त्यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदाअंतर्गत न्यायालयात खटला दाखल करण्याची तरतूद आहे. जे दुकानदार खराब पदार्थ ग्राहकांना देतात त्यांच्या दुकानाला कुलूप लावण्याची कारवाई केली जाणार आहे. दुकान नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. नोंदणी केल्याशिवाय कुणालाही दुकानदारी करता येणार नाही, असे शासनाचे नियम आहेत. १२ लाखांपेक्षा कमी उलाढाल करणाऱ्या दुकानदारांना फक्त १०० रुपयांत फूड परवाना दिला जातो. तर १२ लाखांपेक्षा अधिक उलाढाल करणाऱ्या दुकानासाठी २ हजार रुपयांत फूड परवाना दिला जातो. विना परवानगी फूडची दुकाने चालविणाऱ्यांना दोन लाखांपर्यंत दंड व सहा महिन्यांचा कारावासदेखील होऊ शकतो.
ग्राहकांनीही घ्यावी काळजी प्रत्येक खाद्यपदार्थांसमोर 'बेस्ट बिफोर' लिहिले आहे किंवा नाही, याची चौकशी ग्राहकांनी स्वतः करून घ्यायची आहे. बेस्ट बिफोर लिहिले नसेल तर यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाला तक्रार करता येईल.
दर्शनी भागात लावावे प्रमाणपत्र फूड परवाना प्रमाणपत्र दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या दर्शनी भागात लावावे, जेणेकरून ते दुकान अन्न व नव औषध प्र प्रशासन विभागाच्या अखत्यारीत असून, त्याची नोंदणी झाली आहे, हे ग्राहकांना कळेल. त्यामुळे याची काळजी घेणे गरजेचे आहे.
नोंदणीसाठी करा अर्ज गोंदिया शहरातील २०० जणांनी एफएसएसएएआयसाठी नोंदणी केली आहे. परवाना घेताना एफएसएसएएआय डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.