लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदीला घेऊन चांगलेच वातावरण तापल्यानंतर धान खरेदीला जिल्ह्यात सुरुवात झाली होती. तर दुसरीकडे धान खरेदीची मुदत वाढवून १५ जून करण्यात आली होती. मात्र धान खरेदीचे ९,१२,४६८ क्विंटलचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने जिल्ह्यात शनिवारीच (दि. ११) धान खरेदीला ‘फुलस्टॉप’ लावण्यात आला असून, तसे पत्र पणन अधिकाऱ्यांनी काढले आहे. जिल्ह्यातील शेतकरी सर्वाधिक धानाचे उत्पादन घेत असून, यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, यंदा रब्बी धान खरेदीसाठी केंद्राने राज्याला मर्यादा ठरवून दिली होती. त्यात जिल्ह्याला ९,१२,४६८ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आता तेवढीच धान खरेदी करू शकणार होते. शिवाय शेतकऱ्यांची गैरसोय होणार असल्याने धान खरेदीसाठी १५ जूनपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने १०७ धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली होती. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण होते. मात्र शनिवारी (दि. ११) जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी जिल्ह्याला देण्यात आलेले ९,१२,४६८ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून, तसेच एनईएमएलचे ऑनलाइन पोर्टल बंद झाले असल्याने कोणत्याही संस्थांनी ऑनलाइन लॉट एंट्री करू नये, असे पत्र शनिवारी काढले आहे. यामुळे जिल्ह्यात शनिवारच्या धान खरेदीला फुलस्टॉप लावण्यात आल्याचे दिसत आहे. यामुळे मात्र जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत येणार आहे. याबाबत जाणून घेण्यासाठी जिल्हा पणन अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.