गोंदिया : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनाला बऱ्यापैकी ब्रेक लागल्याचे चित्र आहे. एक आकडीच बाधित रुग्णांची नोंद होत असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दाेन आकडी आहे. बुधवारी जिल्ह्यात ४ नवीन रुग्णांची नोंद झाली तर २१ बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बाधित रुग्णांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या चौपट असल्याचे दिलासादायक चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातून कोरोनाने पाऊल मागे घेतल्याचे चित्र आहे.
बुधवारी जिल्ह्यात ४ रुग्ण आढळले असून यात गोंदिया तालुक्यातील ३ आणि तिरोडा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. बाधित रुग्णांचे प्रमाण बऱ्या प्रमाणात आटोक्यात आले आहे. त्यामुळे येत्या पंधरा ते वीस दिवसांत जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ६५,९२२ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५४,२२२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत ६५,६७२ नमुने तापसणी करण्यात आले. त्यापैकी ५९,५६४ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४,२१३ कोरोना धित आढळले असून, त्यापैकी १३,९२८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत १०२ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ८७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
......
...तर जिल्हा १५ दिवसांत कोरोनामुक्त
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने खालावत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. सद्य:स्थितीत १०२ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्के असून हे चित्र असेच कायम राहिल्यास जिल्हा येत्या १५ दिवसांत कोरोनामुक्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.