वर्धा : शिवाजी चौक परिसरातील जोडे-चपलाचे दुकान जाळण्याची धमकी देत देशी कट्ट्याच्या जोरावर लुटमार करणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री घडली. यात चोरट्यांजवळून लुटीतील २६ हजार ९८० रुपये, देशी कट्टे व पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. रविकुमार सोनपाल कश्चप (१९) रा. शिक्का उत्तर प्रदेश, शहजाद नवाब सिद्दीकी (१९), सिद्दीकी शौकत अली (१९) व शहरखान फकिमुद्दीर (१८) तिघेही रा. उडसणी, जि. बाचपत उत्तर प्रदेश अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. या चारही जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती शहर ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर बुराडे यांनी दिली. पोलीस सूत्रानुसार, शिवाजी चौक परिसरात महोमद जाकीर उर्फ शरीफ शेख रा. शिवाजी चौक यांचे जोडे-चपलाचे दुकान आहे. रविवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या दुकानात चार युवक शिरले. या चारही युवकांनी देशी कट्ट्याच्या जोरावर त्यांचे हात-पाय बांधले. शिवाय त्यांना मारहाणही केली. रक्कम देण्यास नकार देताच या चारही युवकांनी त्यांच्याकडे असलेले पेट्रोल टाकून दुकान जाळण्याची धमकी दिली. यामुळे भीतीपोटी महोमद जाकीर यांनी त्यांच्याकडे असलेले १६ हजार ९८० रुपये, दोन मोबाईल चोरट्यांच्या स्वाधीन केल्याची तक्रार शहर ठाण्यात केली.तक्रार येताच पोलिसांनी बिनतारी संदेशाच्या आधारे जिल्ह्यात घटनेची माहिती दिली. शहरातील बसस्थानक व रेल्वे स्थानकावर चोरट्यांचा शोध सुरू असताना वर्धा रेल्वे पोलिसांनी काही संशयीत आरोपींनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून शहर पोलिसांनी रेल्वे पोलीस स्थानक गाठत अटकेतील आरोपींची ओळख केली असता ते लुटमार करणारेच असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडून चोरीतील रक्कम, दोन मोबाईल व दोन देशी कट्ट्यासह पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी शहर ठाण्यात भादंविच्या कलम ३९४, ४३६ व हत्यार बंदी कायद्याच्या कलम ३२५ अन्वये रविकुमार कश्चप, शहजाद नवाब सिद्दीकी, सिद्दीकी शौकत अली व शहरखान फकिमुद्दीर या चौघांवर गुन्हे दाखल केले. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यांच्याकडून इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, ठाणेदार विजय मगर व पोलीस कर्मचाऱ्यांनी पार पाडली.(प्रतिनिधी)चोरी करण्यापूर्वी पाहिला सिनेमा४चारही जणांनी रविवारी रेल्वेने नागपूर गाठले. तेथून त्यांनी परिवहन महामंडळाच्या बसने वर्धा गाठले. शिवाजी चौकात लूट करण्यापूर्वी या शहरातील एका सिनेमागृहात रात्री ९ ते १२ सिनेमा पाहिला. त्यानंतर शिवाजी चौक परिसरात येत ही चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.अटकेतील एक दुकानातील नोकर ४शिवाजी चौक परिसरात झालेल्या या लुटमारीत अटकेत असलेल्या चार जणांपैकी एक जण दोन महिन्यांपूर्वी याच दुकानात नोकर म्हणून कार्यरत होता. त्याचे नाव शहजाद नवाब सिद्दीकी, असे आहे. त्यानेच योजना आखून ही चोरी केल्याचीही कबुली दिली.
दोन देशी कट्ट्यांसह चौघांना अटक
By admin | Updated: January 26, 2016 02:52 IST