विजय सूर्यवंशी : जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात सभेचे आयोजनगोंदिया : गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक विभाग व निर्वाचक गणामध्ये शासकीय यंत्रणाकडून आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन आचारसंहितेचे पालना करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक आचारसंहितेच्या संदर्भात आयोजित अधिकाऱ्यांच्या सभेत ते बोलत होते. सभेला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी उमेश काळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एन.आर. निमजे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, जिल्हा सांख्यीकी अधिकारी एस.बी. पाचखेडे, आदिवासी विकास विभागाच्या सहायक प्रकल्प अधिकारी मिनाक्षी उमाळे, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यु.एन. वाकोडीकर, तसेच वीज वितरण कंपनी, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, आचारसंहिता ४ जून ते २ जुलैपर्यंत जिल्ह्यात लागू राहणार आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही कार्यक्रम आयोजित करु नये. या काळात नवीन कामे सुरू करता येणार नाही. नवीन नियुक्त्या, बदल्या, भरत्या करता येणार नाही. कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत शंका असल्यास राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेण्यात यावे, असे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, आचारसंहितेच्या काळात सभा, मिरवणुका, भितीपत्रके, पोष्टर्स, बॅनर्स लावण्याबाबत संबंधित कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे, असेही ते म्हणाले.राजकीय पक्ष प्रतिनिधींची सभाजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना घेऊन लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचे राजकीय पक्षांनी सुद्धा निवडणुकीच्या काळात पालन करावे या उद्देशाने शुक्रवारी (दि.५) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आचारसंहितेबाबत व निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली. नामनिर्देशनपत्रे आता उमेदवारांना आॅनलाईन सादर करुन स्वाक्षरीसह स्वत: उपस्थित राहून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच नामनिर्देशन पत्रासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सुद्धा सादर करावे लागणार आहे. तसेच दोन पेक्षा जास्त अपत्य नसल्याचे शपथपत्र, उमेदवार व त्याचे नातेवाईकांचे संपत्ती, अपराध, शैक्षणिक पात्रता याबाबत शपथपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगीतले. विशेष म्हणजे निवडणूक खर्चाची मर्यादा जिल्हा परिषद निवडणूक विभागाकरिता ३ लाख रुपये आणि पंचायत समिती निर्वाचक गणाकरिता २ लाख रुपये असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.सभेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, पुरणलाल उके, जितेश टेंभरे, भाजपचे जयंत शुक्ला, बहुजन समाज पार्टीचे महासचिव डी.बी. भोयर, कोषाध्यक्ष संकल्प खोब्रागडे, भारतीय कम्युनिष्ट पार्टीचे रामचंद्र पाटील, हौसलाल रहांगडाले उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
आदर्श आचारसंहितेचे पालन करा
By admin | Updated: June 7, 2015 01:32 IST