सामान्य जनतेच्या कामाला प्राधान्य : पालीवाल यांनी ऐकल्या व्यथाबोंडगावदेवी : खेड्याच्या विकासामध्येच देशाचा विकास दडला आहे. शेवटच्या टोकावरील माणूसच विकासाचा मुख्य केंद्रबिंदू समजून पहिल्या प्रथमच निवडून आलेले काँग्रेस जि.प. सदस्य गिरिश पालीवाल यांनी थेट गावखेड्यात जावून तेथील लोकांना भेडसावणाऱ्या समस्या ऐकून घेऊन त्या मार्गी लावण्याचा मनोदय ग्रामस्थांसमोर बोलून दाखविला.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवनिर्मित माहुरकुडा प्रभागाचे गोंदिया जि.प. सदस्य गिरिश पालीवाल यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून खेड्याकडे चला हा ध्यास मनोमनी पत्करुन गावखेड्याचा सर्वांगिण विकासावर भर दिल्याचे त्यांनी अंगिकारलेल्या कार्यप्रणालीवरुन दिसून येत आहे. जि.प. सदस्य आपल्या दारी याला अनुसरुन जि.प. सदस्य गिरिश पालीवाल यांनी आपल्या प्रभागातील महालगाव या आदिवासी गावाला पहिल्या प्रथमच भेट देऊन तेथील गावकऱ्यांच्या व्यथा पानटपरीसमोर मनमोकळ्यापणाने ऐकून घेतल्या. एकूण ५०० लोकवस्ती असलेल्या महालगावात ८५ टक्के अनुसूचित जमातीचे तर १५ टक्के अनुसूचित जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी पक्क्या रस्त्यांची गरज आहे. पावसाच्या दिवसात गाववासीयांना तारेवरची कसरत करुन तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. जि.प. सदस्यांच्या गाव भेटीत गावकऱ्यांनी विविध समस्यांचा पाढा वाचला. त्यात महालगाववरून वडेगावला जाणारा तसेच झरपडा ते अर्जुनी-मोरगाव जाणाऱ्या मार्गाची दैनावस्था झाली आहे. ठिकठिकाणी डांबर उकळले आहे. गावात जि.प.ची पहिली ते चौर्थीपर्यंत शाळा आहे. परंतु एका वर्गखोलीची कमतरता आहे. गावात २०-२५ वर्षापासूनची जुनाट अंगणवाडीची ईमारत आहे. लहान बालकांना झाडाखाली बसून अंगणवाडी सेविका संस्काराचे डोस पाजत आहे. वयोवृद्धांना अल्पशे मिळणारे सहाय्य एक हजार मिळावे, गावातील शासकीय कर्मचाऱ्यांनी वेळेच्या आत काम करावे, अशा विविध समस्या साध्याभोळ्या ग्रामस्थांनी जि.प. सदस्य गिरिश पालीवाल यांच्यासमोर ठेवल्या. पालीवाल यांनी गावकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. महालगावच्या जागरुक जनतेने गावातील अडचणी विशद केल्या. त्या मार्गी लावण्याचा निश्चित प्रयत्न करून गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी गावकऱ्यांसमोर दिली.आपला पिंड हा समाजकार्याचा असल्याने सामान्य जनतेच्या कामासाठी कोणतीही तडजोड करणार नाही. जनतेच्या विकासात आडकाठी निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. वेळोवेळी जनतेच्या कामाला धावून येणार. गावाच्या समस्या दूर करण्याच्या कामाला अग्रक्रम देऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावकऱ्यांना मिळवून देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार, अशी ग्वाही गिरिश पालीवाल यांनी गावकऱ्यांसमोर दिली. (वार्ताहर)
ग्रामस्थांच्या समस्या मार्गी लावू
By admin | Updated: October 26, 2015 01:59 IST