रावणवाडी : राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढत आहे. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवेला अलर्ट राहण्याच्या सूचना आहेत, असे असले तरी आरोग्य सोयी-सुविधांना घेऊन जिल्ह्याची कमकुवत बाजू नुकतीच समोर आली आहे.
रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ कर्मचारी बाधित आढळले. या प्रकारामुळे ५ दिवसांसाठी केंद्र बंद करण्यात आले. यामुळे रुग्णांनी उपचारासाठी जावे कुठे, असा प्रश्न उपस्थित करून नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रावर परिसरातील जवळपास १८ गावातील नागरिक उपचारासाठी येत असतात. जिल्ह्यात कोरोना संसर्गाने कहर केला आहे. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच दिलासा म्हणून मागील तीन ते चार दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे, असे असले तरी कोरोना संसर्ग व उद्भवणाऱ्या समस्येला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा २४ तास सज्ज असल्याचा ऊउहापोह केला जात आहे. अशात कोरोना संसर्गाने गावखेड्यातही शिरकाव केला आहे. ग्रामीण भागातील बाधितांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. यामुळे ग्रामीण यंत्रणेची डोकेदुखी वाढत आहेत. गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याने अधिक चौकसपणे संसर्गावर नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे. असे असतानाच प्राथमिक आरोग्य केंद्र रावणवाडी येथील ५ कर्मचारी बाधित झाले. त्यामुळे ते उपचार घेत आहेत. परंतु, कर्मचारी बाधित झाले म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र ५ दिवस बंद ठेवण्यात आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आधीच आरोग्य सेवेची वाणवा आणि त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने उपचारासाठी जावे कुठे, असा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.