सडक-अर्जुनी : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या गावची शाळा आमची शाळा स्पर्धेचे तालुकास्तरीय मूल्यांकण करण्यात आले. यात सडक-अर्जुनी तालुक्यातील प्राथमिक गटातून सौंदड तर माध्यमिक गटातून डव्वा शाळा प्रथम आली.पंचायत समिती सडक-अर्जुनी अंतर्गत तालुकास्तरीय मूल्यांकण समितीने आपला निकाल जाहीर केला. वर्ग पहिली ते चौथीपर्यंतच्या जि.प. प्राथमिक शाळा सौंदडने १७४ गुण मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला. जि.प. प्राथमिक शाळा पिपरीने १५० गुण घेवून द्वितीय तर जि.प. प्राथमिक शाळा खडकीने १४० गुण घेवून तृतीय क्रमांक मिळविला. तसेच चौथा क्रमांक जि.प. प्राथमिक शाळा पळसगावला देण्यात आला.तसेच पहिली ते सातवीपर्यंतच्या माध्यमिक शाळांच्या मूल्यांकणात १६१ गुण मिळवून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा डव्वा प्रथम, १५१ गुण घेवून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा बकी द्वितीय, १२२ गुण घेवून जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा घाटबोरीने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा बाह्मणीला चौथा क्रमांक देण्यात आला. सदर सडक-अर्जुनी तालुका तपासणी पथकामध्ये पं.स. सडक-अर्जुनीचे सभापती निर्मला उईके, उपसभापती दामोदर नेवारे, गटशिक्षणाधिकारी एम.एल. मेश्राम, पंचायत समितीचे सदस्य डॉ. अविनाश काशिवार, खंडविकास अधिकारी आर.जे. धांडे, केंद्रप्रमुख एन.जे. रहांगडाले, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख देशपांडे व पत्रकार प्रभाकर भेंडारकर यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)
प्राथमिकमधून सौंदड तर माध्यमिकमधून डव्वा प्रथम
By admin | Updated: March 13, 2015 01:48 IST