९१ हजार ८११ विद्यार्थी राहणार वंचित : ३.२६ कोटी मिळालेच नाहीकपिल केकत - गोंदियाशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाची योजना यंदा मात्र फसली आहे. विभागाने मागणी केलेला तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांचा निधीच न आल्याने आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करता येणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ९१ हजार ८११ विद्यार्थी गणवेशापासून वंचीत राहणार आहेत. शिक्षणापासून कुणीही वंचीत राहू नये यासाठी शासनाकडून विद्यार्थी व पालकांना आकर्षीत करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षीत करण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले जात असून त्यात एक म्हणजे विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तक वाटपाचा कार्यक्रम आहे. मात्र प्रशासनाच्या लेटलतीफ कार्यप्रणालीमुळे हे कार्यक्रमचं आता फसू लागल्याची स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. यातील पाठ्यपुस्तक वितरणाचा कार्यक्रम यंदा यशस्वी ठरणार. मात्र शाळेच्या पहिल्या विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करण्याचा कार्यक्रम यंदा फसल्याचे दिसून येत आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळेत (जिल्हा परिषद व नगर परिषद) वर्ग १ ते ८ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली तसेच एससी, एसटी व बीपीएल अंतर्गत येत असलेल्या परिवारातील मुलांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत दोन जोड गणवेश दिले जातात. शालेच्या पहिल्या दिवशी या विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करण्याची तशी विशेष योजनाच शासनाकडून राबविली जात आहे. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती गणवेश तयार करून विद्यार्थ्यांना वितरीत करते. पाठ्यपुस्तक व गणवेश मिळाल्यास विद्यार्थ्यांत शाळा व शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यांचा कल शाळेकडे वाढणार असा या मागचा उद्देश आहे. जिल्ह्यात यावर्षी ९१ हजार ८११ विद्यार्थी या योजनेस पात्र ठरत आहेत. यातील ७१ हजार ३१७ विद्यार्थ्यांना गणवेशासाठी ४०० रूपये दराने गणवेश द्यावयाचे आहेत. तर २० हजार ४९४ विदयार्थी राज्य शासनाच्या १०३ विकास गट योजनेंतर्गत येत असल्याने त्यांना राज्य शासनाकडून एक जोड गणवेश दिले जातात. तर या विद्यार्थ्यांना दुसरा जोड सर्व शिक्षा अभियांनांतर्गत दिला जाणार असल्याने त्यांना गणवेशासाठी २०० रूपये लागणार आहेत.त्यानुसार, संबंधित विभागाने शासनाकडे तीन कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपयांची मागणी केली होती. मात्र शासनाकडून अद्याप मागण्यात आलेला निधी देण्यात आलेला नाही. परिणामी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करायचे कसे हा प्रश्न विभागापुढे उभा आहे. त्यातही शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वाटपाची योजना यशस्वी करण्या संदर्भात आदेश देऊन टाकले आहेत. मात्र पैसे न दिल्याने मुख्याध्यापकांची फसगत झाली आहे. शाळेतील एवढ्या विद्यार्थ्यांचे गणवेश आता त्यांना आपल्याकडून पैसे फसवून बनवावे लागणार आहे. तर शिक्षकांचे मागील दोन महिन्यांपासून पगार न झाल्याने त्यांचीही स्थिती बिकट असून त्यात गणवेशाचा बोझा उचलण्यास स्पष्ट नकार दिसून येत आहे. एकंदर यावर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वाटपाची योजना फसली असून विद्यार्थी गणवेशापासून वंचीत राहणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यातही हा प्रकार लगतच्या अन्य जिल्ह्यांतही असल्याने अवघ्या राज्यातच गणवेश काही वाटले जाणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
पहिल्या दिवशी गणवेश नाहीच
By admin | Updated: June 25, 2014 23:48 IST