विजय मानकर
सालेकसा : भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील नवजात शिशूच्या अतिदक्षता कक्षाला आग लागल्यानंतर शासनाने सर्वच शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहे. पण अद्यापही अनेक रुग्णालय आणि प्राथमिक आराेग्य केंद्रात अग्निशमन यंत्रच लागले नाही. सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयाल भेट देऊन पाहणी केली असता रुग्णालयात एकही फायर इस्टिंगविशर लागलेले आढळले नाही.
सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयाला रविवारी भेट देऊन पाहणी केली असता रुग्णालयात एकही फायर इस्टिंगविशर लागलेले आढळले नाही. या रुग्णालयात सामान्य आणि प्रसूतीच्या वाॅर्डात रुग्ण आढळले; परंतु त्यांच्या वाॅर्डातसुद्धा फायर इस्टिंगविशर लागले नव्हते. ज्या ठिकाणी फायर इस्टिंगविशर टांगून ठेवले जाते. त्या खुंट्या रिकाम्या आढळल्या. रुग्ण भरती असलेल्या एका वॉर्डातच डॉक्टर आणि नर्स येणाऱ्या बाह्य रुग्णांची तपासणी करत होते. अधीक्षक वैद्यकीय अधिकारी डी. एच. आर. रामटेके असून ते सुटीवर असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच रूजू झालेले डॉ. राहुल सेवईवार ओपीडी करताना आढळले. लोकमत प्रतिनिधीने रुग्णालयातील फायर इस्टिंगविशर संदर्भात विचारणा केली असता एकूण १२ फायर इस्टिंगविशर असून त्यांची वर्षातून एकदा रिफिलिंग केली जात असल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वीच सर्व १२ फायर इस्टिंगविशर रिफिलिंगसाठी गोंदिया येथे पाठविले असून दोन दिवसांत येणार असल्याचे सांगितले. पण एकाच वेळी सर्व फायर इस्टिंगविशर रिफिलिंगसाठी कितपत योग्य आहे. या दरम्यान कुठली अनुचित घटना घडल्यास या जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भंडाऱ्याच्या घटनेमुळे अख्या महाराष्ट्र खळबळून जागा झाला; परंतु येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सजगता दिसून आली नाही.
......
गरज २० ची लागले बारा फायर इस्टिंगविशर
ग्रामीण रुग्णालयात एकूण २४ खोल्यांचा समावेश आहे. त्यात नोंदणी कक्ष, वैद्यकीय अधीक्षक कक्ष, कार्यालय पट्टीबंधन कक्ष, स्टाफ रूम, औषधी वितरण कक्ष, शालेय आरोग्य चमू कक्ष, औषध भंडारा, आंतररुग्ण औषधीसाठा तीन वाॅर्ड, क्ष किरण, शीतपेटी, प्रयोगशाळा शल्यक्रिया कक्ष, आयसीटीसी कक्ष (३० बेड), प्रसूती कक्ष (३६ बेड) आदीचा समावेश आहे. त्यातुलनेत २० फायर इस्टिंगविशर असण्याची गरज आहे; पण प्रत्यक्षात बारावर काम भागविले जात आहे.
.....
कोट :
‘रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वच उपाययोजना केल्या जात आहे. रुग्णालयात बारा फायर इस्टिंगविशर असून ते रिफिलिंगसाठी पाठविले असून दोन दिवसांत रिफिलिंग होऊन येणार आहेत.
डॉ. एस. आर. रामटेके,वैद्यकीय अधीक्षक