सालेकसा : सालेकसा-दरेकसा मार्गावर नवाटोला गावाजवळ जुन्या रेकार्डप्रमाणे आदिवासींच्या मालकीच्या जमिनीवर पेट्रोलपंप उभारण्याचे काम गोंदिया येथील एक गैर आदिवासी करीत असून, त्याचे पेट्रोलपंप उभारण्याचे काम थांबवून ती जागा मूळ आदिवासी मालकाला परत करण्यात यावी, यासाठी उपोषण करण्यात आले.
आदिवासी किसान सैनिक संस्थेच्या मांझी सैनिकांनी एका दिवसाचे धरणे देत मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. अशात ती जागा आदिवासींना परत मिळणार की पेट्रोलपंपचे अर्धवट काम पूर्ण होणार याकडे लक्ष लागले आहे. मौजे नवाटोला येथील प. हन ९६ तहसील गोंदिया जि.भंडाराचे बंदोबस्त मिशननुसार १९१७-१८ च्या पी-१ रेकार्डवर कालम नं. ५ मध्ये जमीन मालकाचे नाव इंदलबापू मडावी असे नोंद असून, ती जागा मडावी परिवाराने नंतर त्याच गावातील कोट्टेवार आणि येटरे परिवाराला विक्री केली. परंतु कालांतराने शासनाने आदिवासी कायदा व भू-राजस्व संहिता कलम १७० (ख) प्रमाणे ज्या गैर आदिवासींनी आदिवासींची शेतीची जमीन परत करावी, असा आदेश काढला. परंतु ती शेतजमीन त्या गैर आदिवासींनी परत न करता तिसऱ्या गैर आदिवासी व्यक्ती गोंदिया येथील व्यक्तीला विक्री केली. ते त्या जमिनीवर सध्या पेट्रोलपंप उभारत आहे. पेट्रोलपंपाचे काम बरेच पूर्ण झाले आहे. दरम्यान इंदलबापूचे वारसदार हमीलाल मडावी यांनी ती जागा आपल्याला परत मिळावी म्हणून शासनाकडे अर्ज केला. तसेच लोकप्रतिनिधीकडेसुद्धा विनंती केली. मात्र या प्रकरणाची कोणीच दखल घेताना दिसून आले नाही. त्यामुुळे हमीलाल मडावी यांच्या पत्नी रामबत्ती मडावी या बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. जमीन परत मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
....
जमीन मालकाच्या मुलांची दिल्लीकडे धाव
जागा परत मिळावी म्हणून जमीन मालक हमीलाल मडावी यांची मुले नसीम मडावी आणि राधेश्याम मडावी हे मांझी सैनिकांच्या पदाधिकाऱ्यांसोबत राजमाता फुलवा देवी ज्या आंतरराष्ट्रीय समाजवाद मांझी सैनिक संस्था संचलित करतात त्यांच्याकडे गेले असून, याबाबत केंद्रीय आदिवासी व जनजाती मंत्रालयातसुध्दा संपर्क करतील, अशी माहिती रामबत्ती मडावी यांनी दिली.