दुग्ध भेसळीचे आंतरराज्य कनेक्शन
एकोडी : दुधाची आवक कमी होऊनही दुधाचे वितरण व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यात येत आहे. दुधात भेसळ करून हे पदार्थ तयार करण्याचा सपाटा सुरू आहे. एका महिन्यापूर्वी येथील दोन दूध संकलन व वितरण केंद्रावर संबंधित विभागाने चौकशी केली होती. ही चौकशी नियमित होती की काही गौडबंगाल होते, हे गुलदस्त्यात आहे.
बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट
आमगाव : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तात्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.
शेतशिवारात माकडांच्या उच्छादात वाढ
सालेकसा : शेतशिवार मोकळे झाले आहे. याचा फायदा आता माकडांना होत असून भाजीपाला पिकांमध्ये माकडांचा उच्छाद सुरू आहे. काही शेतकरी शेतात जाऊन माकडांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु कुणालाही यश येत नाही. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा
तिरोडा : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. मोकाट जनावरांमुळे बाजारपेठेत जास्तच त्रास असून वाहतूक विस्कळीत होते. मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम राबविण्याची मागणी आहे.
शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा
साखरीटोला : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण बेरोजगार आहेत. ते पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ३३ वर्षावरून ३५ वर्ष करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार तरुणांकडून केली जात आहे.
शेंडा परिसरात नेटवर्कची समस्या
सडक अर्जुनी : तालुक्यातील ग्राम कन्हारपायली, शेंडा, आपकरीटोला, उशिखेडा, पाटीलटोला, लेंदिटोला, मोहघाटा, दल्ली, लेंडीटोला, हलबीटोला, पांढरी, सिंदिपार, सलाईटोला, मुशानझोरवा या गावात टॉवर नसल्याने ग्राहकांची अडचण होते. नेटवर्कची समस्या सोडविण्याची मागणी परिसरातील मोबाईलधारक नागरिक करीत आहेत.