हलक्या धानाची आवक जोमात : आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदीकपिल केकत - गोंदियाशासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी हाती आलेले हलके धान मोठ्या आशेने कृषी उत्पन्न बाजार समितीत विकत आहेत. मात्र बाजार समितीत शेतकऱ्यांच्या या धानाला आधारभूत किंमती पेक्षा कमी दर दिले जात आहे. १३६० रूपये आधारभूत किंमत असलेले हलके धान बाजार समितीत सर्वाधीक १२२५ रूपये दराने खरेदी केले जात आहे. यातून मात्र बाजार समितीतही शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. गोंदिया जिल्ह्याला धानाचा कटोरा म्हणून ख्याती प्राप्त आहे. जिल्ह्यात धानाचेच सर्वाधीक पिक घेतले जाते. मात्र यातही हलक्या धानाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात होते. हलके धान म्हणायचे झाल्यास त्यात आयआर व १०१० या प्रतीच्या धानाचा समावेश होतो. खरिपातही शेतकऱ्यांनी हलक्या प्रतीचे धान पिक जास्त घेतले असून बहुतांश शेतकऱ्यांचे धान हाती आले आहे. सध्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी दिवाळीत पैसे हाती असावे या उद्देशातून मोठ्या आशेने आपले हलके धान बाजार समितीत विकले. येथे बाजार समितीबाबत जाणून घेतले असता, येथील बाजार समितीत १५३ गावे येतात. बाजार समितीचे नवीन वर्ष १ आॅक्टोबर पासून सुरू होते व तेव्हापासूनच धान खरेदीही सुरू झाली आहे. बाजार समितीतून मिळालेल्या माहितीनुसार, २१ आॅक्टोबर पर्यंत बाजार समितीत चार हजार ८९३ क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. यात दोन हजार ८१८ क्विंटल हलके धान आहे. तर दिवाळी नंतर ३० व ३१ आॅक्टोबर या दोन दिवसांची खरेदी वेगळीच आहे. बाजार समितीत सध्या हलक्या धानाची आवक जास्त प्रमाणात असून यात आयआर व १०१० या धानांचे प्रमाण जास्त आहे. शासनाने सर्वसाधारण धानाला सन २०१४-१५ या वर्षात एक हजार ३६० रूपये आधारभूत किंमत जाहीर केल्याचे खूद्द बाजार समितीकडून सांगीतले जात आहे. मात्र याच बाजार समितीत हलक्या धानात मोडणाऱ्या आयआर या धानाला आतापर्यंत एक हजार १५० ते एक हजार २२५ रूपये तर १०१० या धानाला एक हजार १४० तर एक हजार २२० रूपये प्रती क्विंटल भाव दिला जात असल्याचेही बाजार समितीतूनच कळले. म्हणजेच शेतकऱ्याला आयआर या धानाच्या विक्रीत प्रती क्विंटल १३५ तर १०१० च्या विक्रीत प्रती क्विंटल १४० रूपये कमी दिले जात आहे. यात धानाची गुणवत्ता बघून भाव दिले जाते हे जरी खरे असले तरिही बाजार समितीत आलेला पूर्ण धान अत्यंत खालच्या दर्जाचा असेल हे ही शक्य नाही. एकंदर बाजार समितीतही शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
बाजार समितीतही शेतकऱ्यांची पिळवणूक
By admin | Updated: November 2, 2014 22:36 IST