लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोविड-१९ लसीकरणाचा एकही डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांकडून गोंदिया जिल्हा परिषद खुलास मागवीत आहे. आधी १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लस घेतली नव्हती. मात्र, त्यापैकी ११६ जणांनी लस घेतली आहे. आणखी ३६ लोकांनी अद्यापही लस घेतली नाही. या बाबीला गांभीर्याने घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी २२ ऑक्टोबर रोजी पत्र काढून त्या ३६ कर्मचाऱ्यांनी २९ ऑक्टोबरपर्यंत लस का घेतली नाही, याचा खुलासा करून तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून तसे प्रमाणपत्र शिक्षण विभागाला सादर करावे, अन्यथा त्यांचे वेतन थांबविले जाणार आहे. गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ११ ऑक्टोबरपर्यंत कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकही डोस घेतलेला नाही त्यांना ११ ऑक्टोबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजाविले. त्यापैकी ११६ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस लगेच घेतला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी दोन डोस घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेत प्रवेश दिला जाणार नाही, असे पत्र काढले होते. कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात मुकाअ पाटील अत्यंत संवेदनशील आहेत. या लसींमुळे एकतर बाधित व्यक्तीला गंभीर परिणाम होत नाही. शिवाय त्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तीला लागण होत नसल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. यामुळेच शासन व प्रशासन कोरोना लसीकरणासाठी धडपडत आहे.
३६ शिक्षकांना गंभीर आजार?- ५ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीकरण करवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. असे असतानाही जिल्ह्यातील आतापर्यंत ३६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसच घेतली नाही. त्यामुळे त्या शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना गंभीर आजार तर नाही. गंभीर आजार असेल तर त्यांना लस घेण्यापासून डॉक्टरांनी मनाई केली का? याचा संपूर्ण तपशील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मार्फत मुकाअ गोंदिया यांना सादर करायचा आहे. जे कर्मचारी खुलासा सादर करणार नाहीत त्यांचे वेतन थांबविले जाणार आहेत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले आहे.
लवकरात लवकर लस घ्या शासनाकडून कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेबाबत बोलले जात आहे. मात्र, ही लाट कुणालाही परवडणारी नसून त्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण हाच एकमेव उपाय हाती आहे. करिता ज्या विद्यार्थ्यांच्या पालक व गावकऱ्यांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही, अशांनी पहिला डोस घ्यावा. -अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., गोंदिया.