गोरेगाव : राज्याच्या प्रत्येक क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीनुरूप शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. जिल्ह्यात विविध विकासात्मक कामे सुरू असून अनेक कामे शासनाच्या विचाराधिन आहेत. या सर्व योजना कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचवाव्या, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.तालुक्यातील सोनी जि.प. क्षेत्राच्या सदस्य सीता रहांगडाले यांच्या वतीने आयोजित भाजप कार्यकर्ता मेळावा तसेच नवनिर्वाचित आमदार व खासदार यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.ते पुढे म्हणाले, येत्या काळात सिंचनासह शेतीपूरक उद्योग साधला जाईल. सोबत बेरोजगार व बचत गटाच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबविले जाणार आहेत. ही विकास कामे जनतेपर्यंत पोहचावेत यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यातूनच पक्ष व शासनाप्रति जनतेचा विश्वास वाढेल, असे ते म्हणाले.भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली माजी आ. हेमंत पटले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी ना. राजकुमार बडोले, खा. नाना पटोले, आ. विजय रहांगडाले यांचा जि.प. सदस्य सीता रहांगडाले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सोहळ्याला माजी आ. खुशाल बोपचे, खोमेश रहांगडाले, रेखलाल टेंभरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिलीप चौधरी, रविकांत बोपचे, सभापती चित्रकला चौधरी, तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, युवराज रहांगडाले, संजय बारेवार, रूषीलाल टेंभरे, शशी फडे, पंकज रहांगडाले, सुरेश रहांगडाले, नितीन कटरे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविकातून सीता रहांगडाले यांनी सोनी क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा मांडला. शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी निवेदन पुस्तिका सादर केली. अध्यक्षीय भाषणात विनोद अग्रवाल यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेताना, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले. मतभेद बाजूला ठेऊन कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाचे कार्य हे स्वत:चे कार्य समजून करावे आणि पक्षाला बळकट करावे, असे आवाहनही त्यांनी केले. खा. नाना पटोले यांनी आगामी काळात सर्वसामान्यांना नक्कीच चांगले दिवस येतील, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी आ. विजय रहांगडाले, हेमंत पटले, खोमेश रहांगडाले यांनीही मार्गदर्शन केले. संचालन कमलेश रहांगडाले व आभार युवराज रहांगडाले यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
शासनाची विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवा
By admin | Updated: February 28, 2015 01:07 IST