नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आरोग्याची काळजी घेण्यासाठी फक्त डॉक्टरांचीच गरज नसते तर त्यासाठी आधुनिक उपकरणांचीही (मशीन) गरज असते. शासनाने बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील रूग्णांची संख्या पाहता अत्यंत महागड्या मशिन्स पुरविल्या आहेत. परंतु महत्त्वाच्या काही नवीन व काही जुन्या मशिन्स बंद पडून आहेत.गंगाबाई रूग्णालयात रूग्णांवर वापरण्यात आलेले शस्त्र व मशीनचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सन २०११-१२ मध्ये २० लाखांचे आॅटोक्लेव्ह मशीन खरेदी करण्यात आली. त्या मशीनला ठेवण्यासाठी सुव्यवस्थित जागा नसल्याने गंगाबाईच्या शस्त्रक्रिया गृहातील मीटर रूम मध्ये ठेवण्यात आले होते. याचा काहीच वापर होत नसल्याचा मुद्दा समोर आल्यावर सन २०१५-१६ मध्ये या मशीनसाठी एक वेगळी खोली तयार करण्यात आली. जेसीबी व क्रेनच्या मदतीने हे मशीन त्या खोलीत ठेवण्यात आले.परंतु मागील एक वर्षापासून ते बंदच आहे. नवीन खरेदी केलेले मशीन मागील पाच-सहा वर्षापासून सुरूच झाले नाही. हे महत्त्वाचे मशीन बंद असल्याने निर्जंतुकीकरण करण्याचे काम छोट्या मशीनच्या माध्यमातून होत आहे. नवजात बालकांच्या कक्षात (एसएनसीयू) असलेले आॅटोक्लेव्ह मशीन फक्त ८०० रूपयांच्या कॉईलसाठी मागील दीड महिन्यांपासून बंद आहे. या आॅटोक्लेव्ह मशीनच्या दुरूस्तीची जबाबदारी फायबर सिंधुरी या कंपनीला देण्यात आली. त्या कंपनीच्या कर्मचाºयांनी या मशीनचे बिघडलेले कॉईल नेले मात्र दुसरे कॉईल आणलेच नाही.गंगाबाईत प्रसूतीचे प्रमाण अधिक असल्यामुळे प्रसूती दरम्यान गुंतागुंत होणाºया रूग्णांसाठी व्हेंटीलेटरची गरज असते. गंगाबाई स्त्री रूग्णालयात महिलांसाठी आयसीयू नसतांनाही या ठिकाणी २००५-०६ मध्ये चार व्हेंटीलेटर पाठविण्यात आले. जागेअभावी एक नवीन व्हेंटीलेटर पडून होते. त्या व्हेंटीलेटरचे वायर उंदरांनी तोडले. ११ वर्षापूर्वी आणलेल्या व्हेंटीलेटरसाठी आता ‘प्रसूती पश्चात गुंतागुंत’ कक्षाची उभारणी करणे सुरू आहे. नवजात बालके किंवा बाळंतिणींना गळ्यात कफ असल्यास किंवा त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यास सक्शन मशीनची गरज असते. गंगाबाईत ८ सक्शन मशीन आहेत. यापैकी ३ सक्शन मशीन बंद आहेत. गर्भवतींना शस्त्रक्रियासाठी भूल देण्यासाठी लागणारे बॉईल्स अॅप्रेट्स या मशीन आहेत. त्यापैकी एक मशीन बंद असल्याने काम सुरू ठेवण्यासाठी दुसरी मशीन रजेगाव ग्रामीण रूग्णालयातून आणण्यात आली. नवजात बाळांना योग्य मात्रेत सलाईन पुरविण्यासाठी १२ इन्फुजन पंप आहेत. यापैकी ४ पंप बंद असल्याने एकाचवेळी इतर बालकांना सलाईन लावले जात नाही. केटीएस मधील सीटीस्कॅन मशीन अत्यंत जुन्या पध्दतीचे असून तेही बंदच असते. पाच ते सहा महिन्यांपासून एक्सरे मशीन बंद आहे. सोनोग्राफी किंवा क्ष-किरण तज्ज्ञ एक किंवा दोन तासच सेवा देत असल्यामुळे येथील रूग्णांना खासगी रूग्णालयाकडे धाव घ्यावी लागते.दोन कोटींचा हिशेब कोण देणार?दोन कोटी खर्च करुन केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात एक्स्प्रेस फिडर लावण्यात आले. परंतु हे एक्स्प्रेस फिडर सुरुवातीपासून बंद आहेत. वीज वितरण कंपनी या एक्स्प्रेस फिडरला सुरू असल्याचे सांगते, मात्र हे बंद आहे. हे एक्स्प्रेस फिडर कार्यान्वित असल्यास कधीच वीज पुरवठा खंडीत होऊ शकत नाही. पावसाळ्याचे दिवस असतानाही दोन्ही रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होतोे. मागील दोन-तीन वर्षापासून वीज वितरण कंपनीने वेगवेगळे कारण सांगून टाळण्याची मोहीम सुरूच ठेवली. गंगाबाईतील तार वारंवार जळतात, लो टेन्शन लाईन असल्यामुळे हायटेंशन लाईन लावावी, असा सल्ला वितरण कपंनीने दिला होता. हा भार सांभाळण्यासाठी १० बाय १२ ची खोली बनवून ट्रान्सफार्मर लावण्यासाठी दीड वर्षापासून खोली तयार करण्यात आली. परंतु तेथे ट्रान्सफार्मर बसविण्यात आले नाही. गंगाबाईतील दोन जनरेटरपैकी एक बंद आहे. आकस्मिक विभाग, शस्त्रक्रिया पश्चात कक्ष, प्रसूती पश्चात कक्षात इन्व्हर्टरची गरज आहे.गंगाबाईतील मशीन्स बंद असल्याने ते दुरूस्त करण्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य सेवा म्हणजेच जिल्हा शल्यचिकीत्सक व गंगाबाईचे अधीक्षक यांची आहे. मेडीकलचे हे भाड्याचे घर आहे त्यासाठी त्यांनी त्याकडे लक्ष द्यायला हवे.व्ही.पी.रूखमोडेवैद्यकीय अधिष्ठाता मेडिकल कॉलेज, गोंदिया.
महागड्या मशीन्स बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:17 IST
आरोग्याची काळजी घेण्यासाठी फक्त डॉक्टरांचीच गरज नसते तर त्यासाठी आधुनिक उपकरणांचीही (मशीन) गरज असते. शासनाने बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील रूग्णांची संख्या पाहता अत्यंत महागड्या मशिन्स पुरविल्या आहेत.
महागड्या मशीन्स बंदच
ठळक मुद्देनिर्जंतुकीकरणाकडे दुर्लक्ष : एक्स्प्रेस फिडरचे दोन कोटी पाण्यातच