सालेकसा : तालुक्याची लाईफ लाईन समजल्या जाणारा आमगाव सालेकसा दरेकसा मार्ग आज घडीला पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे नजर हटी दुर्घटना घटी ही म्हण खरी ठरत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे.
राज्य महामार्ग म्हणून ओळखला जाणारा हा मुख्य रस्ता तालुक्याच्या महत्त्वाचा आहे. या मार्गाशिवाय तालु्क्यातील कोणत्याही हालचालीची कल्पनाच करता येत नाही. या मार्गाकडे शासन प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. या मार्गावरुन प्रवास करणे प्रवाशांच्या जीवावर बेतणारे ठरत आहे. प्रवाशांचा जीव गेला तरी चालेल पण प्रवास खड्ड्यातूनच करा असे चित्र आहे. आमगाव सालेकसा दरेकसा मार्ग हा आमगावपासून वाघ नदीपर्यंत ३ किमी फक्त आमगाव तालुक्यात येत असून वाघ नदीपासून सालेकसा तालुक्याची सीमा प्रारंभ होऊन सालेकसापर्यंत १३ किमी सालेकसावरुन दरेकसापर्यंत १५ किमी आणि दरेकसाच्या पुढे राज्याच्या सीमेवर असलेल्या चांदसूरजपर्यंत सात किमी आणि नंतर पुढे छत्तीसगड राज्यात प्रवेश करुन डोंगरगड शहराला जोडते. एकूण ३५ किमी लांबीचा रस्ता राज्य महामार्ग आहे. तसेच आमगाव ते सालेकसा, साकरीटोला, झालीया, कावराबांध, गोवारीटोला, पानगाव, रोंढा, मुरुमखोला या गावावरुन जाणारे रस्ते या मार्गाशी मध्य प्रदेशला जोडतात.
.....
निकृष्ट बांधकामाकडे दुर्लक्ष
साकरीटोला, मोहाटोला, कोटजमूरा, नवेगाव, बाम्हणी, खेडेपार, गल्लाटोला येथील सीमेवरुन दररोज हजारो लोक मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात सतत ये-जा करीत असतात. या सीमेवरील दोन्हीकडील गावाकडचे नातेवाईक सुध्दा आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या शहराकडे जाण्यासाठी मध्य प्रदेशातील आणि छत्तीसगड राज्यातील लोक या महामार्गावरुनच प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावरुन २४ तास वर्दळ असते. या मार्गाचे अनेकदा डांबरीकरण करण्यात आले. पण बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याने अल्पावधीत रस्त्याची स्थिती जैसे थे होते.
.....
डागडुजीचे वय दोन दिवस
आमगाव-सालेकसा मार्गावरुन जाताना काही ठिकाणी दोन तीन महिला कामगार हातात झाडू घेऊन रस्ता स्वच्छ करताना दिसतात त्यानंतर एखदा दुसरा मजूर त्यावर थोडासा डांबरीकरण करुन गिट्टी टाकून जातो व रस्ता दुरुस्तीची सारवासारव केली जाते. परंतु फक्त दोनच दिवसात ती डागडुजी निघून जाते आणि रस्ता पुन्हा खड्डेमय होतो.
.......