कपिल केकत गोंदिया शहराच्या ह्दयस्थळी वसलेल्या प्रभाग क्रमांक ६ मधील बहुतांश भाग सिव्हील लाईन्स मध्ये मोडतो. शिवाय शहरातील गणेशनगर व बाजार भागातील परिसरही या प्रभागात येत असल्याने प्रभाग चांगलाच मोठा आहे. यातील राहुल यादव व सुनिता हेमणे या दोनही नगरसेवकांची ही पहिलीच वेळ आहे. येथील चारही नगरसेवकांनी आपपला परिसर वाटून घेतला आहे. यातील तीन नगरसेवक भाजपचे तर एक नगरसेवक राष्ट्रवादीचा आहे. तरिही ते एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे ऐकू आले. सफाईचा अभाव, सांडपाण्याचे डबके, डुकरांचा हैदोस, कचरा व सांडपाण्याने बरबटलेल्या नाल्या तसेच उखडलेल्या रस्त्यांचे दचके येथील नागरिकांच्या नशिबी आहे. नगरसेवक येत नाही. तक्रार केल्यास आश्वासन देतात मात्र समस्या सोडविल्या जात नसल्याचे नागरिक सांगतात. मामा चौकातून प्रभागात पाय ठेवल्यास सांई मंदिर रोडवर दचके खात पुढे जावे लागते. सफाई मंदिराच्या परिसरातच तुंबलेल्या नाल्या व कचऱ्याचे ढिगार नजरेत पडतात. या ट्रेलरवरूनच उर्वरीत पिक्चर डोळ््यापुढे येते. साईनगर नव्याने वसत असलेली कॉलनी असून येथील रस्ते बघताच परतून जावे अशी स्थिती आहे. नाल्यांअभावी प्लॉटमध्ये सांडपाण्याचे डबके तयार झाले आहेत. त्यात डुकरांचा वावर, यामुळे दुर्गंध व डासांचा प्रकोप आहे. अशा कठिण परिस्थितीत नागरिकांना रहावे लागत आहे. येथील काहींनी तर नगरसेवकाने आपल्या घराजवळचा रस्ता बनवून अन्य नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याचे बोलून दाखविले. गोविंदपूर रोडतर जागोजागी उखडला आहे. गजानन महाराजांच्या मंदिरासमोर पावसाळयात पाणी साचत असल्याचे नागरिकांनी सांगीतले. गटार फुटलेले, नाल्या तुंबलेल्या आहेत. नगरसेवकांचे दर्शन होत नसून फक्त वोट मागण्यासाठी आले होते असे येथील नागरिक सांगतात. एवढेच नव्हे तर समस्या सांगीतल्यास तो परिसर आमचा नसल्याचे सांगत टोलवाटोलवी करून आपली जबाबदारी झटकत असल्याचेही येथील नागरिकांनी सांगीतले. पथदिवे व्यवस्थीत असल्याचे नागरिकांनी सांगीतले. गांधी वॉर्डात लोकांशी संवाद साधला असता त्यांनी, महिना-महिना कचरा पडून राहत असून उचल होत नसल्याचे सांगत आपला रोष व्यक्त केला. झाडू लागतो मात्र सफाई होत नाही. पाईपलाईनसाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने रस्ते खोदले. मात्र त्यांची दुरूस्ती न झाल्याने नागरिकांनी ये-जा करण्यात त्रास होत आहे. रस्त्यांमुळे कित्येक अपघातही येथे घडल्याचे नागरिकांनी सांगीतले. विशेष म्हणजे नगरसेवकांच्या येण्या-जाण्याचा हा रस्ता असल्यामुळे ते दिसतात. मात्र त्यांना काही समस्या सांगीतल्यास फक्त आश्वासन मिळत असून त्यांची पूर्तता होत नसल्याचे येथील महिलांनी सांगीतले. वोटसाठीच नगरसेवक आल्याचे नागरिक बोलतात.
समस्यांचा पाढा संपेना...
By admin | Updated: March 13, 2015 01:57 IST