अधिकारी उदासीन : वनसमिती व ग्रामपंचायतची तक्रार सडक अर्जुनी : जवळ असलेल्या पांढरवानी येथे एका शेतकऱ्याने वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून पाण्याचा बोअर देखील मारला आहे. या अतिक्रमणामुळे संतप्त झालेल्या वन व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतने उपवन संरक्षक वनविभाग गोंदिया, जिल्हाधिकारी व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय सडक-अर्जुनी येथे तक्रार दाखल केली आहे. मात्र अधिकारी चौकशीकरिता उदासिन दिसत असल्याचे गावकरी चर्चा करीत आहे. पांढरवानी येथे शासकीय वनजमीन क्र. ५५३ गट क्र.८० आराजी पाच हेक्टर आरमध्ये निताराम नंदू डोंगरवार रा. रेंगेपार (दल्ली) यांनी अवैधरित्या कब्जा करून शेती उपयोगाकरिता अतिक्रमण केलेले आहे. तसेच २० डिसेंबरला अतिक्रमण शेतजमिनीवर सिंचनाकरिता बोअरवेलचे खोदकाम केले. बोअरवेलचे खोदकाम चालू असता वनव्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामपंचायतचे पदाधिकारी जावून बोअरवेलचे खोदकाम थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी अतिक्रमणधारकांनी अवार्च शब्दात शिविगाळ केली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गावाला लागून काही जंगल असावे. त्याचे संवर्धन वन व्यवस्थापन समितीकडूून करण्यात यावे, याकरिता वनसंरक्षणासाठी वन व्यवस्थापन समित्या तयार करण्यात आल्या. परंतु काही थोड्याफार आर्थिक लाभासाठी वन विभागाचेच कर्मचारी अतिक्रमण धारकांशी संगनमत करून त्यांना पट्टे मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे अशा वन कर्मचाऱ्यांमुळे वनाचे संरक्षण तर होत नाही, परंतु वनाचे प्रमाण कमी होत चालले आहे. वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी हे अतिक्रमण धारकांना मदत करीत असतील तर अशा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी सडक-अर्जुनी तालुक्यात जोर धरत आहे. पांढरवानी येथील वन विभागाच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार वन समितीचे अध्यक्ष सोविंदा नागपुरे, उपाध्यक्ष संगीता मेश्राम, कोषाध्यक्ष अनिता उईके, सदस्य दामोदर लाडे, रूपचंद लाडे, राजकुवर मरस्कोल्हे, मनिषा खोब्रागडे, राजकुमार रामटेके, सुलोचना टेकाम यांनी तसेच उपसरपंच दामोदर लाडे, सदस्य रामेश्वर डोंगरवार, संगीता मेश्राम, वैशाली कोटांगले, अनिता उईके, ओमप्रकाश नागडे व असंख्य गावकऱ्यांनी उपवन संरक्षक, जिल्हाधिकारी गोंदिया यांना केली आहे. अतिक्रमण हटविण्यात वनविभागाला अपयश आल्यास गावकरी, ग्रामपंचायत व वन व्यवस्थापन समिती आंदोलन करणार, असा इशारा देण्यात आला आहे. (तालुुका प्रतिनिधी)
पांढरवानी येथे वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण
By admin | Updated: December 29, 2016 01:15 IST