बाराभाटी : स्थानिक परिसर व येरंडी-देव या ठिकाणी मजुरांच्या हातांना काम नाही. त्यामुळे मजुरांची भटकंती सुरूच आहे. तालुक्यामध्ये ६० टक्के रोजगार हमीची कामे सुरू झाली. परंतु येरंडी परिसरात रोजगार हमीचा अजीबात पत्ताच नसल्याचे चित्र दिसत आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्याचा विचार केला तर तालुक्याच्या बऱ्याच भागात पंचायत समितीमार्फत अनेक गाव परिसरात रोजगार हमी योजनेची कामे सुरू दिसतात. मात्र येरंडी-देव गाव परिसरात रोजगार हमीचा थांगपत्ताच नाही. यामुळे गावातील मजूरवर्ग बाहेर गावी व शहरात आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी भटकंती करीत आहेत. काम सुरू करण्यासाठी नेमलेले पदाधिकारी लक्ष देतच नाही. ते स्वत:च्या खासगी कामातच व्यस्त दिसतात. आपल्या पोटाची काळजी पदाधिकाऱ्यांना आहे, पण उपाशी राहणाऱ्या मजूर वर्गाची चिंता मुळीच नसल्याचे त्यांच्या कार्यप्रणालीवरून दिसून येत आहे. पंचायत समिती कार्यालयामध्ये चौकशी केली असता रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याचे दस्तावेजसुध्दा पूर्ण करून कार्यारंभ आदेश मिळाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रोजगार हमीची कामे सुरू करायला काहीच हरकत नाही. परंतु येथे तर रोजगार हमीचा पत्ताच दिसत नाही. आता मात्र रोजगार हमी तत्काळ सुरू झाली नाही तर जिल्हा परिषद गोंदियाकडे ही समस्या घेवून जाण्याची तयारी परिसरातील नागरिकांनी दर्शविली आहे. स्वत:चे पोट भरून गोर-गरिबांची, सर्वसामान्यांची चिंता नसेल तर याला जबाबदार कोण? निष्काळजीपणा दाखविणारे अधिकारी की पदाधिकारी, असा सवाल नागरिकांनी केला आहे. (वार्ताहर)
येरंडी परिसरात रोजगार हमी बेपत्ता
By admin | Updated: March 14, 2015 01:22 IST