गोंदिया : महिला व बालकांच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असून यासाठी विशेष विभाग आहे. मात्र येथील महिला व बाल विकास विभागाच विकासापासून कोसो दूर असून अगोदर या विभागाचे कल्याण करण्याची खरी गरज आहे. कारण, विभागाला कर्मचाऱ्यांचे ग्रहण लागले आहे. येथील पदे रिक्त पडलेली असून त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच कामाचा बोजा पडतो. अशात एखादे काम किंवा माहिती मागीतल्यास संबंधीतांना चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे. सन २००३ पासून सुरू झालेले हे कार्यालय एकतर गावाच्या टोकावर अंगूर बगिचा येथे या विभागाचे कार्यालय असल्याने तेथे जाण्याच्या नावानेच नागरिकांना धडकी भरते. शिवाय पदे असतानाही कार्यालयातील पदे भरण्यात आलेली नसल्याने अधिकारी कर्मचारी नसल्याचे कारण पुढे करून हात मोकळे करतात. कार्यालयात जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. मात्र या पदाचा प्रभार जिल्हा परिवीक्षा अधिकारी नम्रता नागदिवे (चौधरी) यांच्याकडे असल्याने कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकारी चालवित असल्याचे चित्र आहे. शिवाय तीन परिवीक्षा अधिकाऱ्यांचे पदं असून येथील तिघांची पदोन्नती व स्थानांतरण झाल्यावर हे तिन्ही पदं रिक्त पडून होते. सध्या त्यातील एका पदावर के.बी.रामटेके रुजू झाले असून अन्य दोन पदं रिक्त पडून आहेत. तर नव्याने तयार मंजूर करण्यात आलेले लेखाधिकारीचे पद सुद्धा रिक्त आहे. तसेच कनिष्ठ लिपीकाची दोन पदं असून त्यातील एक कर्मचारी नागपूर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या विभागीय कार्यालयात कार्यरत असल्याने एकच लिपीक काम करीत आहे. विशेष म्हणजे या कार्यालयाला वाहनं मंजूर असताना अद्याप तरी वाहन उपलब्ध झालले नाही. तर चालकाचे पद सुद्धा रिक्त पडून असल्याने एकंदर एवढ्या मोठ्या कार्यालयात खुर्च्या असून त्यावर बसण्यासाठी कर्मचारी नसल्याचे चित्र आहे. कर्मचाऱ्यांच्या या कमतरतेमुळे आहे तेवढ्यांवरच कामाचा बोजा पडतो. अशात कार्यालयातून माहिती मागीतल्यास अधिकारी एकतर कर्मचाऱ्यांची कमी असल्याचे कारण पुढे करून वेळ मारून नेतात. त्यानंतर संबंधीताला माहितीसाठी चकरा मारण्या शिवाय गत्यंतर नसल्याचे चित्र बघावयास मिळते. (शहर प्रतिनिधी)
महिला व बाल विकास विभागाला कर्मचाऱ्यांचे ग्रहण
By admin | Updated: June 19, 2014 23:53 IST