सात गावे आदिवासी क्षेत्रात : जिल्हा परिषद अध्यक्षांचे एक गैरआदिवासी गावसालेकसा : यावर्षी जलयुक्त शिवार योजना राबविण्यासाठी सालेकसा तालुक्यातील एकूण आठ गावांची निवड करण्यात आली आहे. यापैकी एकूण सात गावे आदिवासी अतिदुर्गम भागातील गावे असून उर्वरित एक गाव गांधीटोला हे जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांचे स्वगाव असून त्यांनी आपल्या गावासाठी विशेष प्रेम दाखविल्याचे बोलले जात आहे. तसेच तालुक्यातील झालीया आणि आमगाव खुर्द जि.प. क्षेत्रातील एकही गाव या योजनेत घेण्यात आले नाही. त्यामुळे या क्षेत्रातील लोक कमालीचे नाराज झाले असून याकडे दुर्लक्ष का, असा सवाल करीत आहेत.ज्या सात आदिवासी गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला, त्यात हलबीटोला (सालेकसा), कोसमतर्रा, कुलूरभट्टी, पांढरवाणी, मानागढ, दंडारी, मुरकुटडोह या गावांचा समावेश आहे. तर जि.प. अध्यक्षाच्या प्रयत्नाने त्यांचे गांधीटोला हे गैरआदिवासी गाव या योजनेत समाविष्ट करण्यात आले. जलयुक्त शिवार योजनेत या गावामध्ये बोडी दुरुस्ती, शेततळे, नाला खोलीकरण, सिमेंट बंधारे, माती बंधारे, गाव बोळीतील गाळ काढणे, खोलीकरण करणे, भात खाचरे दुरुस्ती इत्यादी कामे करुन त्या गावात व गाव शिवारात वर्षभर पाण्याची सोय व संचय कसे करता येईल, यासाठी कामे केले जातील. तालुक्यातील पिपरीया, सोनपुरी, कावराबांध, तिरखेडी, झालीया परिसरातील गावेसुद्धा जलयुक्त शिवार योजनेत घ्यावी, असी मागणी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
आठ गावे जलयुक्त शिवारात
By admin | Updated: February 8, 2016 01:56 IST