गोंदिया : जिल्ह्यात लसीकरणाची चळवळ जोमात सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात ८३२६११ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. याची ६४.०६ एवढी टक्केवारी आहे. विशेष म्हणजे, लसीकरणात १८-४४ गटातील तरुणाई आताही अग्रेसर असून या गटातील ३४३६७१ तरुणांनी लस घेतली आहे.
देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली असून तेव्हापासून जिल्हा लसीकरणात अग्रेसर राहिला आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात झपाट्याने लसीकरण केले जात असून यासाठी आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरू करून नागरिकांची सोय करून दिली आहे. परिणामी जिल्ह्याने आठ लाखांचा टप्पा पार केला असून रविवारपर्यंत (दि.५) जिल्ह्यातील ८३२६११ नागरिकांचे लसीकरण केले आहे. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येत लसीकरण केंद्र असल्याने नागरिकांना लस घेण्यासाठी इतरत्र जाण्याची पाळी येत नसल्याचेही चांगले परिणाम दिसून येत आहे.
जिल्ह्यातील लसीकरणात १८-४४ गटातील तरुणाई सुरुवातीपासूनच अग्रेसर असतानाच आताही त्यांची आकडेवारी जास्त दिसून येत आहे. यामध्ये १८-४४ गटात ३४२६७१ तरुणांचे लसीकरण करण्यात आले आहे. ४५-६० गटात २८६५७६ नागरिकांचे तर ६० व त्यावरील गटात १४८९४२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. म्हणजेच, तरुणाई लसीकरणात अग्रेसर आहे.
--------------------------------------
दुसरा डोस घेणारे फक्त १५ टक्केच
जिल्ह्यात आतापर्यंत ८३२६११ नागरिकांचे लसीकरण झाले असून त्याची टक्केवारी ६४.०६ एवढी आहे. यामध्ये ६३४१९८ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची टक्केवारी ४८.८० असतानाच दुसरा डोस घेणारे फक्त १९८४१३ म्हणजेच १५.२७ टक्के नागरिक आहेत. यावरून पहिला डोस घेण्यासाठी नागरिक पुढे येत असतानाच मात्र दुसरा घेण्याकडे ते दुर्लक्ष करीत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.