बाराभाटी : बोळदे-कवठा येथील अंगणवाडीतील बालकांना चक्क सडक्या अंड्याचा आहार दिल्याचे निदर्शनात आले. शुक्रवारला अंगणवाडीमध्ये मुलांना एका ऐवजी २-२ अंडी वाटप करण्यात आली. ती अंडी सडलेली होती. त्यामुळे मुलांनी खाल्ली नाहीत. अंड्यांना दुर्गंधी येत होती. अंड्याना खिचडीत मिसळून खा, असाही जीवघेणा मोफत सल्ला अंगणवाडीमधील स्वयंपाक शिजवणाऱ्या राईबाईने दिला.शासनाच्या आदेशानुसार आठवड्यातून एक दिवस केळी (बुधवार) व एक दिवस अंडी (शुक्रवार) ला देण्याचे अंगणवाडीमध्ये बंधनकारक आहे. त्यामुळे बोळदे-कवठा येथे ही योजना अधून-मधून राबविली जाते. परंतु देण्यात येणारी अंडी सडके असल्याने अंगणवाडीमध्ये आपल्या मुलांना रोगी बनविण्यासाठी पाठवावे का? असा सवाल येथील पालकांना केला आहे. अंगणवाडीतर्फे दिलेली २ अंडी खाऊन न झाल्यामुळे येथील एक विद्यार्थीनी ते अंडे घरी घेऊन गेली त्या अंड्यातून दुर्गंधी येत होती. ही बाब पालकांच्या निदर्शनास आली. अंगणवाडीमध्ये दिल्या गेलेला आहारसुध्दा निकृष्ट दर्जाचा आहे. खिचडीतून मूगडाळ गायब झाली आहे. महिन्यातून बरेच दिवस अंगणवाडी सेविका आंगणवाडी अनुपस्थित असते. याबद्दल विचारले असता मीटींगचे कारण असल्याचे सांगितले जाते. कायमस्वरूपी अंगणवाडी सेविका मुलांच्या शिक्षणासाठी नियुक्त करावी व एक मिटींग करण्याकरिता असावी. येथील सुपरवायजर अनेक दिवस अंगणवाडीला भेट देत नसल्याचा आरोप शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बोळदेचे केशव किरसान, मंगलमूर्ती रामटेटे, ग्रा.पं. सदस्य अनसूया किरसान, सुमित शहारे, दिलीप किरसान, डिलक्स सुखदेवे, चंद्रशेखर रामटेके, विशाल चिमणकर, नरेश किरसान, धम्मदीप मेश्राम यांनी केला आहे. तत्काळ कारवाई करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना सडक्या अंड्याचा आहार
By admin | Updated: September 10, 2015 02:06 IST