लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एकीकडे शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील २०० वर्गखोल्या जीर्ण असून, पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न पालकवर्गातून उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १०३८ प्राथमिक शाळा असून, २३ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात मोठ्या थाटामाटात शाळा प्रवेशोत्सव पार पडला. मात्र, जीर्ण वर्गखोल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मागील वर्षी गोरेगाव तालुक्यातील ग्राम साईटोला येथील जि.प. शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने तीन विद्यार्थी जखमी झाले. या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धोकादायक शाळेत शिकायला मुलांना पाठविणे आई-वडिलांना धोक्याचे वाटत आहे. शाळा आणि वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून मागणी करण्यात आली आहे. या शाळांचे परिषदेकडून केले जात नसून फक्त शाळा धोकादायक असल्यास याबाबत अहवाल दिला जातो. जिल्हा नियोजन समितीमध्ये यासाठी निधीची मागणी केली जाते. मात्र, निधी अल्प प्रमाणात मिळतो. ३० कोटींची गरज असताना १० कोटी मिळाले आहेत.
२०० वर्गखोल्यांना त्वरित दुरुस्तीची गरजजिल्ह्यातील २०० वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ३० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. यंदा या वर्गखोल्यांसाठी १० कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. उर्वरित निधीची प्रतीक्षा आहे.
दुरुस्तीसाठी आणखी २० कोटींची गरजशाळा आणि वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी एकूण ३० कोटींची गरज होती. मागील वर्षी जिल्हा नियोजन समितीमधून १० कोटी रुपये दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. आणखी २० कोटींची गरज आहे.
निधी कधी मिळेल ?जिल्हा नियोजन समितीमध्ये यासाठी निधीची मागणी करण्यात आली असून, पालकमंत्र्यांच्या आदेशाने हा निधी उपलब्ध केला जातो.जिल्हा परिषदेच्च्या जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील २०० वर्गखोल्यांसाठी १० कोटी मिळाले. उर्वरित निधी कधी मिळेल, असा जिल्हावासीयांचा सवाल आहे.
१० कोटींतून डागडुजी की नवीन बांधकाम?एका वर्गखोलीची डागडुजी (रिपेअरिंग) केली, तर पाच लाख रुपये लागतात आणि नवीन वर्गखोली बांधली, तर १५ लाखांची गरज असते. जिल्हा नियोजनमधून मिळालेल्या १० कोटींतून फक्त रिपेअरिंग केली, तर २०० वर्गखोल्यांची डागडुजी होईल; परंतु नवीन वर्गखोली केली, तर ६४ वर्गखोल्या नवीन बांधल्या जातील. आता शिक्षण विभाग संपूर्ण डागडुजी की नवीन इमारत बांधकाम करते, हे वेळ ठरवेल.
"जिल्ह्यातील जीर्ण वर्गखोल्यांसाठी १० कोटी रुपये मिळाले आहेत. त्यातून नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. वर्गखोल्यांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन वर्गखोल्या बांधल्या जाणार आहेत."- गोविंद बघेले, अभियंता समग्र शिक्षा अभियान, गोंदिया