गोंदिया : गोरेगरिबांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी व २०२२ पर्यंत सर्वांच्या डोक्यावर स्वत:च्या हक्काचे छप्पर उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी पंतप्रधान आवास योजनेसह इतर योजनेतून घरकुल मंजूर केले जात आहे. घरकुल मंजूर झाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी आपले मोडकेतोडेके घर घाईघाईने पाडून टाकले. मात्र, आता घर पाडल्यानंतर त्यांना वेळेवर घरकुल बांधकामाचे हप्ते मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली असून, त्यांना ऊन, वारा, पावसाचा सामना करीत उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. मागील वर्षी आलेल्या कोरोना लाटीचासुद्धा फटका घरकुल लाभर्थ्यांना बसला. जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नाही त्यामुळे रेतीअभावी बांधकाो ठप्प होती. बांधकाम पूर्ण न करता आल्याने अनेक लाभार्थ्यांना बांधकामाच्या हप्त्याची अडचण करण्यास उचल झाली. या सर्व प्रक्रियेत जवळपास वर्षभराचा कालावधी लोटला. त्यामुळे रेती, विटा, गिट्टी, सिमेंट, लाेखंड यांच्या दरात वाढ झाल्याने घरकुल बांधकामाचे बजेट बिघडले. शासनाकडून मात्र जेवढे इस्टिमेट मंजूर आहे, त्यानुसार पैसे मिळत असल्याने अनेक लाभार्थ्यांना कर्ज काढून अथवा नातेवाइकांकडून उधार उसनवारी करून घरकुलाचे बांधकाम पूर्ण करावे लागत आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मागील वर्षी ३७१५४ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी चौथ्या आणि पाचव्या हप्त्याची रक्कम घरकुलाचे बांधकाम पूर्ण होऊनसुद्धा अनेक लाभार्थ्यांना मिळाली नाही, त्यामुळे त्यांच्यावर पंचायत समिती कार्यालयाच्या पायऱ्या झिजविण्याची वेळ आली आहे.
........
जिल्ह्यातील पीएम आवास योजनेची आकडेवारी
किती लोकांना मंजूर झाले घरकुल : ३७१५४
किती लाभार्थ्यांना मिळाला बांधकामाचा पहिला हप्ता : २०३२८
किती लाभार्थ्यांना पुढील दीड लाख रुपयांचा हप्ता मिळणे बाकी आहे : १७४५३
..............................
साहेब डोक्यावरील होते नव्हते छप्पर गेले
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आम्हाला घरकुल मंजूर झाल्याने आम्ही घाईघाईने मोडकळीस आलेले घर पाडून टाकले; पण मागील वर्ष कोरोनात गेले. त्यानंतर बांधकामाला सुरुवात केली; पण सर्व बांधकाम साहित्याचे दर अवाच्या सव्वा वाढले आहेत, तर आठ ते दहा हजार रुपये मोजल्यावर रेती मिळत आहे. अशात आमच्यासारख्या गोरगरिबाने घरकुल कसे पूर्ण करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम पूर्ण न झाल्याने हप्तेदेखील थकले असून, दुकादाराचे कर्ज वाढले आहे, अशात काय करावे हेच कळत नाही. असे घरकुल लाभार्थ्यांनी सांगितले.
..... कोट
घरकुलाच्या थकीत हप्त्यासाठी मी मागील तीन-चार महिन्यांपासून पंचायत समिती कार्यालयाच्या चकरा मारीत आहे; पण अद्यापही हप्ता मिळाला नाही. त्यामुळे उर्वरित बांधकाम करायचे कसे आणि उधार उसनवारी फेडायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- -रामप्रसाद सोनुले, घरकुल लाभार्थी,
......
आधी घरकुलाचे बांधकाम रेतीअभावी रखडले होते, आता रेती उपलब्ध होत असली तरी बांधकामासाठी उर्वरित पैसे न मिळाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. घराचे बांधकाम सुरू असल्याने मागील वर्षभरापासून भाड्याच्या घरात वास्तव्य करीत आहे.
-गुरुदास वसाके, घरकुल लाभार्थी
......
घरकुल लाभार्थ्यांना निधीचे वितरण करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. निधी प्राप्त होत त्याचे घरकुल लाभार्थ्यांना वितरण केले जाईल.
.........
तीन वर्षांत मंजूर झालेल्या घरकुलांची आकडेवारी
सन २०१८ - ५४ हजार
सन २०१९ - ९२ हजार ८७३
सन २०२० - ३७ हजार १५४
.............