सालेकसा : इतरांच्या जातीचा किंवा धर्माचा अपमान होऊ नये, असे कृत्य करू नये. नदीचे घाट किंवा इतर ठिकाण असो तेथे अस्पृश्यतेचा शिरकाव नको. सर्वांनी बंधुत्व ठेऊन खेळीमेळीच्या वातावरणात वावरणे गरजेचे आहे, असे विचार सेवानिवृत्त न्यायाधिश सी.पी. चौधरी यांनी कावराबांध येथे आयोजित लोकअदालतमध्ये व्यक्त केले.तालुका विधी सेवा समिती व वकील संघ आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल व्हॅन या लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. यात ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त न्यायाधिश सी.पी. चौधी होते. अतिथी व मार्गदर्शक म्हणून अॅड. एस.डी. बागडे, सरकारी वकील पुरुषोत्तम आगाशे, पोलीस निरीक्षक रणदिवे व ओ.बी. डोंगरवार यांनी विचार व्यक्त केले. तर समाजसेविका मोहिनी निंबार्ते, कोटांगले, भेलावे, सरपंच बनोठे, उपसरपंच नूतनलाल नागपुरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बनोठे, प्रल्हाद बनोठे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पणाने झाली. यात अॅड. आगाशे यांनी विधी सेवा समितीच्या विषयावर, ओ.बी. डोंगरवार यांनी तंटामुक्त गाव तर पोलीस निरीक्षक रणदिवे यांनी बालगुन्हेगारी यावर तर अॅड. बागडे यांनी विविध कायद्यांची माहिती दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात सी.पी. चौधरी यांनी आपण अस्पृशतेच्या कारणावरुन इतरांना शिव्या देतो, असे कृत्य आपण करु नये.वाईट नजरेने महिलांकडे बघू नये. बघण्याबरोबर कृती करणे म्हणजे तो गुन्हा होतो, अशाप्रकारे विविध बाबींवर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. या वेळी सालेकसा तालुक्यातील १५ तंट्याचे निवारण करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संचालन नागपुरे यांनी तर आभार मोहन राठी यांनी मानले. कार्यक्रमासाठी न्यायालयीन कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
अस्पृश्यतेच्या कारणावरुन कोणालाही रोखू नये
By admin | Updated: March 12, 2015 01:17 IST