गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता लसीकरणावर जास्त भर दिला जात असून त्यानुसार जिल्ह्यात लसीकरणाची गती वाढविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रविवारी सुटीच्या दिवशीही लसीकरण केले जात असून यातूनच जिल्ह्यात रविवारी (दि. ४) लक्ष्यपूर्ती झाली. म्हणजेच जिल्ह्यात रविवारी करण्यात आलेल्या लसीकरणानंतर एकूण १०१९०७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
कोरोना आता पुन्हा आपला कहर दाखवीत आहे. झपाट्याने रुग्णवाढ होत असून पुन्हा एकदा कठोर निर्बंध व लॉकडाऊनचा निर्णय शासनाला घ्यावा लागत आहे. अशात कोरोनाला हरविण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करण्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. यातूनच आता शासनाने ४५ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे लस घेणाऱ्यांची संख्याही वाढली असून त्यासोबतच आता लसीकरणाला गती दिली जात आहे. विशेष म्हणजे, जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावे यासाठी सुटीच्या दिवशीही लसीकरण सुरू केले जात आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही रविवारी लसीकरण करण्यात आले. त्यानंतर आता जिल्ह्यातील एकूण १०१९०७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यावरून लसीकरणासाठी आता नागरिकही पुढाकार घेत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
---------------------------------
रविवारी तब्बल ५६५१ नागरिकांचे लसीकरण
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता याला नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे असल्याने शासनाने लसीकरणावर भर दिला आहे. यासाठी सुटीच्या दिवशीही लसीकरण सुरू ठेवावे, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातही रविवारी (दि. ४) लसीकरण सुरूच होते व एकूण ५६५१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात, १४ आरोग्य कर्मचारी, ४६ फ्रंटलाइन वर्कर्स, ४५ ते ६० वयोगटातील ३६८७ तर ६० वर्षांवरील १९०४ नागरिकांचा समावेश आहे.
-------------------------
ज्येष्ठ नागरिक आले चांगलेच फॉर्मात
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या १०१९०७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. या आकडेवारीला विविध गटांत विभागण्यात आल्यानंतर मात्र यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त दिसत आहे. यात, १३९३० आरोग्य कर्मचारी, १९५१५ फ्रंटलाइन वर्कर्स, २५५२३ नागरिक ४५ ते ६० वयोगटातील असून ४२९३९ नागरिक ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आहेत. यावरून ज्येष्ठ नागरिक लसीकरणाला घेऊन चांगलेच फॉर्मात असल्याचे दिसून येत आहे.