कोहमारा ते वडसा या राज्य महामार्गावरील परसोडी रै. या गावातील शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात पिकविलेला भाजीपाला, हिरवा हरभरा, हरभऱ्यांचा ताजा हुरडा व इतर ताजा शेतमाल विक्रीसाठी आणला होता. हा बाजार परसोडी रै. येथे कोहमारा ते वडसा या राज्य महामार्गाच्या बाजूला भरविण्यात आला होता. भाजीपाल्यामध्ये पत्ताकोबी, टोमॅटो, वटाणा, हिरवी मिरची, मुळा, पोपट, लाखोरी व तुरीच्या शेंगा, कांदा व लसणाची हिरवी पाने, कारली, आदी ताजा शेतमाल विक्रीसाठी दुकाने लावली होती. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उपक्रमातून बाजारात आणलेल्या शेतमालास अपेक्षित भाव मिळाला. रयत बाजारात शेतकऱ्यांनी पिकविलेला दर्जेदार शेतमाल माफक भावात मिळाल्याने ग्राहकसुद्धा समाधानी होते. या बाजारास गोंदिया उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी बी. एल. पाटील यांनी भेट देऊन व शेतकऱ्यांकडील भाजीपाला विकत घेऊन शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणीत केला. बाजार परसोडी रै. येथे राज्य महामार्गावर दररोजच भरविला जाणार असून, या बाजारातून शेतकऱ्यांकडील ताजा शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करण्यात येणार आहे. तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार, मंडळ कृषी अधिकारी कुमुदिनी बोरकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) विलास कोहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. बाजाराच्या आयोजनासाठी परसोडी रै. चे शेतीमित्र देवराम कोरे व तालुका कृषी अधिकारी या कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
...
कोट :
‘आमच्या शेतात विकणारा शेतमाल पूर्वी आम्ही ठोक खरेदीदाराला विक्री करीत होतो. परंतु, या थेट विक्री उपक्रमातून आम्ही आमचा शेतमाल स्वत:च ग्राहकांना विकत असून, यातून जवळपास तिप्पट भाव आमच्या शेतमालास मिळत आहे.
- तुरसो हंसाराम शेंडे, महिला शेतकरी.