ठाणा पेट्रोलपंप २७ वा भीम मेळावा : अमृत बन्सोड यांचे प्रतिपादनजवाहरनगर : देशाला किंबहुना जगाला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होण्यासाठी एकमेव धम्माची गरज आहे. तथागत बुद्धाने दिलेल्या शांती, अहिंसा, प्रज्ञा, करूणाचे पालन करा. धम्म हा दैनंदिन जीवनाची प्रक्रिया आहे. परिणामी देशाचे किंबहुना जगाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन साहित्यीक अमृत बन्सोड यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक महासभा ठाणा पेट्रोलपंपद्वारे दोन दिवशीय २७ व्या भीम मेळाव्याप्रसंगी आनंद बुद्ध विहार येथे साहित्यीक अमृत बंसोड बोलत होते. अध्यक्षस्थानी आयुध निर्माणीचे अतिरिक्त महाप्रबंधक एम.एस. मस्के होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर, पंचायत समिती सदस्य राजेश मेश्राम, सरपंच कल्पना निमकर, उपसरपंच देवेंद्र डुंभरे, प्रा. एम.टी. शेंडे, एस.के. मेश्राम, मदनपाल गोस्वामी, संतोष गोंडाणे, इंद्रप्रसाद मेश्राम उपस्थित होते.जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर म्हणाले, एक संघटीत समाज रचनेने चांगले विचारक घडवू शकतो. त्यासाठी सुसंस्कारीक विचाराची आजच्या काळात गरज आहे. ते या भीम मेळाव्या प्रसंगी आपणास मिळते, याकडे सर्वांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे. अध्यक्षीय भाषणात अतिरिक्त महाप्रबंधक मस्के म्हणाले , भारतीय घटनेने आपल्या सर्वांना एक मौलिक अधिकार दिला. वैचारिक स्वतंत्र, सकारात्मक विचार पुढे करून आपले जीवन साफल्य करा.तत्पूर्वी प्रथम दिनी ध्वजारोहण पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आले. दुपारनंतर भाषण, स्लो सायकल, चमचा गोळी, स्मरण शक्ती, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात चमचा गोळी स्पर्धेत आस्था बागडे, सुधांशू मेश्राम, पलक बागडे, स्लो सायकलमध्ये लक्की बागडे, स्मरण शक्तीमध्ये, गौरव उके, लक्की बागडे, रिना फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन चरित्र या विषयावर भाषण स्पर्धेत रिमा कावळे, रोहिनी रामटेके, आर्यन मेश्राम, रांगोळी स्पर्धेत निकिता मेश्राम, तेजस्वी वानखेडे, रोहिणी रामटेके यांचा समावेश होता. पाहुण्याच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. दुसऱ्या दिवशी भीम रॅलीचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी भाषणांचा कार्यक्रम झाला. रात्रीला समाजप्रबोधन पर लोमेश भारती व वैशाली किरण आणि त्यांचा संच यांचा भीम बुद्ध गितावर आधारित समाजप्रबोधन कार्यक्रम झाला.प्रास्ताविक सचिव सुभाष रामटेके यांनी केले. संचालन गणेश वानखेडे यांनी केले. आभार कोषाध्यक्ष विनायक मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक महासभेचे व पंचशील जॉब स्टडी सर्कलचे पदाधिकारी आणि सदस्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
धम्म हा दैनंदिन जीवनाची प्रक्रिया
By admin | Updated: November 16, 2015 01:54 IST