विलास शिंदे
देवरी : शहरात सन १९६९ पासून सलग ५२ वर्ष गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश चौकमधील नवयुवक किसान मंडळाच्यावतीने साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावर्षी सामाजिक बांधीलकी जपत रक्तदान शिबिर व लसीकरण अभियानासह वृक्षारोपण, फळवाटप सारखे उपक्रम राबविण्यात येत आहे. दरवर्षी या मंडळाद्वारे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून मागील २० वर्षांपासून ही परंपरा कायम ठेवली आहे.
लक्षवेधी समाज प्रबोधनात्मक आणि आकर्षक देखावे सादर करणाऱ्या गणेश मंडळापैकी नवयुक किसान गणेश मंडळ यावर्षी कोरोनाचे संकट आणि शासनाचे नियमांचे पालन करीत साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करीत आहे. मंडळाच्यावतीने सलग २० वर्षांपासून स्त्रीभ्रूणहत्या, अंधश्रध्दा निर्मूलन, दहशतवाद, २६-११ हल्ला, पर्यावरण संवर्धन अशा विविध सामाजिक उपक्रमांवर भर दिला जात आहे. ५२ वर्षांपूर्वी या मंडळाची स्थापना व गणपतीची स्थापना स्व. कन्हैयालाल शाहू यांनी केली होती. गणेश चौक परिसरातील युवकांनी अथक परिश्रम करून या मंडळाचा नावलौकिक काढविला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीचे या देवरीचा राजाला २०१६ साली महाराष्ट्र राज्य शासनाचा तसेच तालुका, जिल्हा व नागपूर विभाग अंतर्गत प्रथम पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.
.............
अपेक्षित तेथे उपस्थित हे ब्रीदवाक्य
अपेक्षित तेथे उपस्थित हे ब्रीदवाक्य असलेल्या या नवयुवक किसान गणेश मंडळाचे कार्यकर्ते शहरातील सर्व सामाजिक कार्यक़्रमात हिरिरीने भाग घेतात. या मंडळाचा नावलौकिक वाढविण्यात मंडळाचे अध्यक्ष दिनेश भेलावे, उपाध्यक्ष लेखराम निर्वाण, सचिव संजय बडगये, जवाहरलाल शाहू, सदस्य फत्तू श्रीभाद्रे, बाला निर्वाण, निखिल शर्मा, विजय चव्हाण, रवी भोयर, संकेत शर्मा, विक्की कटरोेले, राजू मानकर, कैलास सोनवाने, होनिंद्र निकोडे, अमित उजवणे, नीलेश वगारे, सागर सोनवाने, किशोर वडगये, गणेश नाईक, शिवम शाहू, राहुल मोहुर्ले यांचा मोलाचा वाटा आहे.