गोंदिया : कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घेतली म्हणून कुणी बिनधास्त होत असेल तर त्यांनी सावधान होण्याची गरज आहे. कारण दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होत असून, असाच प्रकार गोंदिया तालुक्यात घडला आहे. रावणवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी दोन्ही डोस घेतल्यावरही ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे लस घेतल्यानंतरही तोंडावर मास्क व शारीरिक अंतराचे पालन हा नियम आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.
पोलीस निरीक्षक उमेश पाटील हे २७ मार्च रोजी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना होऊ शकतो. कारण ॲन्टीबॉडी तयार होण्यासाठी वेळ लागतो व त्यासाठी तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे, तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक पाटील यांना आधी सर्दी-खोकला होता. २-३ दिवसांपूर्वी त्यांनी लस घेतली होती व लस घेतल्यानंतर त्यांना इन्फेक्शन झाले होते. पहिली लस घेतल्यानंतर दुसरी लस ६ ते ८ आठवड्यांच्या आत घेणे आवश्यक आहे. आधी ही वेळ २८ दिवसांची होती. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस व पहिल्या डोसच्या अडीच महिन्यानंतर शरीरात ॲन्टीबॉडी तयार होतात. यामुळे लस घेतल्यानंतरही तोंडावर मास्क लावणे गरजेचे असून, फिजिकल डिस्टन्सचे पालन करणेदेखील आवश्यक आहे.