प्रशासन अधिकारीच नाही : पालिकेच्या प्राथमिक शिक्षणाची बोंबाबोंब गोंदिया : पालिकेचा प्राथमिक शिक्षण विभाग मागील दोन वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर चालत आहे. मात्र आता तर हे प्रभारी अधिकारीही बदली होऊन गेल्याने प्रशासन अधिकाऱ्यांचे पद रिक्त पडून आहे. यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाचा कारभार वाऱ्यावर असून याचा प्रभाव शाळांवर पडत आहे. पालिकेच्या शाळांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. मोजकेच विद्यार्थी असल्यामुळे शाळा बंद करण्याची पाळी नगर परिषदेवर आली आहे. याला पालिका प्रशासना गलथान कारभार जबाबदार आहे. याचे कारण असे की, पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासन अधिकाऱ्यांचे पद मागील दोन वर्षांपासून रिक्त आहे. तत्कालीन प्रशासन अधिकारी मदारकर हे सन २०१२ मध्ये सेवानिवृत्त झाले व तेव्हापासूनच त्यांचे पद रिक्त पडून आहे. ते सेवानिवृत्त झाल्यावर प्रशासन अधिकाऱ्यांचा कारभार तिरोडाचे एस.एस. ठाकरे यांच्याकडे देण्यात आला होता. त्यामुळे प्रशासन अधिकाऱ्यांचा कारभार प्रभारी अधिकारी चाल१’त होते. मात्र त्यांच्याकडे तिरोडाचा कारभार व येथील प्रशासन अधिकाऱ्यांचा कारभार असल्याने त्यांची गोची होत होती. परिणामी ते आठवड्यातून काही दिवस येथे येत होते. अशात एक ना धड भाराभर चिंध्या हीच गत प्राथमिक शिक्षण विभागाची झाली होती असे बोलणे वावगे ठरणार नाही. विभागाकडे प्रशासन अधिकारीच नसल्याने विभागाचा कारभार रेटला जात आहे. यामुळे मात्र पालिकेच्या प्राथमिक शाळांची गत दयनीय झाली आहे. विभागाच्या कारभारावर जातीने लक्ष ठेवायला अधिकारीच नसल्याने पालिकेच्या प्राथमिक शाळांची दर्जा खालावत चालला आहे. परिणामी पालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये बोटांवर मोजण्याइतके विद्यार्थी असल्याने शाळा आॅक्सिजनवर आल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)
शिक्षण विभाग पोरका
By admin | Updated: July 1, 2015 02:21 IST