मुंडीकोटा : दिवाळीचा उत्सव संपत आला असून परिसरात सध्या मंडईची धूम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हातात हलक्या धानाचे पीक आले आहे. मात्र शासनाचे आधारभूत धान खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही. त्यामुळे मुंडीकोटा परिसरात त्वरीत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.परिसरातील अनेक गावात विहिरीवरील वॉटर पंपच्या साहाय्याने हलक्या जातीच्या धानाची लागवड करण्यात आली. यावर्षी पाऊस अधिक प्रमाणात पडला नसला तरी शेतकऱ्यांनी आपली रोवणी आटोपून घेतली. आता दिवाळी संपत आली व मंडई सुरू होत असताना शेतकऱ्यांच्या हाती पैसा नाही. हलके धान विकून पैसा मिळविण्याचा प्रयत्न केला तर शासनाचे आधारभूत धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नाही. हलक्या धानाचा हंगाम विविध रोगांमुळे समाधानकारक नसला तरी दिवाळीची लगीनघाई सुरू झाली आहे. या भागातील शेतकरी पाऊस आला नाही तरी हलक्या धानाची कापणी व मळणी करून दिवाळीचा खर्च भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण दिवाळी व मंडईच्या खर्चाकरिता शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यामुळे खर्चापोटी शेतकरी आपले धान व्यापाऱ्याला विकत आहेत. व्यापाऱ्यांकडे धानाला भाव नाही व अकलवंतांना गरज नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी खर्चाकरिता फार कमी किमतीत व्यापाऱ्यांना धान विकत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची लुबाडणूक होत आहे.यावेळी शेतकरी हा कोंडीत सापडलेला दिसत आहे. पण शेतकऱ्यांचा वाली कुणी दिसत नाही. अनेक समस्या सहन करूनही आता या समस्येला शेतकरी तोंड देत आहेत. शासनाने मुंडीकोटा येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
By admin | Updated: October 26, 2014 22:43 IST