केशोरी गावाच्या दर्शनी भागात असलेली जागा येथील मातृभूमी सेवा समितीला गाव विकास व सौंदर्यीकरणासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. या जागेवर गावातून निघणारा कचरा घंटागाडीच्या माध्यमातून साठवून ठेवण्यासाठी कचरा यार्ड तयार करण्यात आला आहे. या कचरा यार्डमधील प्लास्टिक पिशव्या, कोंबड्याची पिसे लागून असलेल्या साकोली- केशोरी या महत्त्वाच्या जिल्हा मार्गावर पसरत असल्यामुळे दुर्गंधी निर्माण होत आहे. या रस्त्याने रात्रंदिवस वाहने धावत असून त्याचबरोबर गावातील मंडळी सकाळी, संध्याकाळ या रस्त्याने चालण्याचा- धावण्याचा सराव करीत असतात. त्यांना या कचरा यार्डमधून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. काही गावांतील क्रिकेटप्रेमी या जागेला लागून असलेल्या खाली जागेचा उपयोग क्रिकेट खेळण्यासाठी करीत आहेत. त्यांनासुद्धा या कचरा यार्डचा त्रास होत आहे. कचरा यार्डमुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन प्रदूषणात वाढ झाली आहे. या जागेतील कचरा यार्ड त्वरित हटवून गावापासून १ किमीवर असलेल्या भटाळातील झुडपी जागेमध्ये गावातील कचरा टाकण्याची व्यवस्था येथील ग्रामपंचायत प्रशासनाने करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नियोजित जागेतील कचरा यार्ड हलविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST