देवरीतील प्रकार : मुख्याध्यापकाने केली कारवाईची मागणी देवरी : तालुक्यात परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना कॉपी न करु देणारे केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेली शाळा मनोहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कॉपी करु न दिल्याने काही पालकांकडून सोशल मीडियावर शाळेची नाहक बदनामी करण्याचा प्रकार केला असून या प्रकरणाची योग्य चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी शाळेचे प्राचार्य के.सी. शहारे यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी देवरी पोलीस स्टेशनला तक्रारही दाखल केली आहे. सविस्तर असे की, शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचे तालुक्यात सर्वच शाळांनी ठरविले. या आदेशापुर्वीसुद्धा देवरी शहरातील मनोहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दरवर्षी दहावी व बारावीचे परीक्षा केंद्र असते. शाळेच्या कडक शिस्तीमुळे या केंद्रावर कॉपी चालत नाही. परंतु १९ मार्च रोजी भूमिती विषयाच्या पेपरमध्ये एका विद्यार्थ्याने खिशात कॉप्या भरुन नेल्या. त्याम रुममध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे खिशे तपासून कॉपी काढल्या. या घटनेची तक्रार त्या विद्यार्थ्याने आपल्या पालकांकडे केली. यावर त्या पालकांनी त्या वर्गातील शिक्षकाला शिवीगाळ केली. प्रकरण चिघळत असताना शाळेचे प्राचार्य यांनी मध्यस्थी करुन पालकांना समजाविले. शाळेत कोणत्याही विद्यार्थ्याला कॉपी करु दिल्या जात नाही असे सांगितले. यावर कॉपीचे समर्थन करणारे पालकांनी शाळेवर भेदभाव करण्याचा आक्षेप केला असून सोशल मिडीयावर संदेश टाकून शाळेला बदनाम करण्याचे षडयंत्र केल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. शाळेची कोणत्याही प्रकारची बदनामी सहन करुन घेणार नाही, असे सांगून मुख्याध्यापकांनी सोशल मिडीयावर शाळेची बदनामी करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी आमच्या शाळेत दहावी व बारावीचे परीक्षा केंद्र असते. हजारो विद्यार्थी या केंद्रातून परीक्षा देत असतात. नियमानुसार परीक्षा घेतली जात असून दरवर्षी कॉपीमुक्त अभियान राबवून परीक्षा घेतली जाते. कॉपीला समर्थन करणारे लोकच षडयंत्र रचून शाळेची बदनामी करीत आहे. परंतु भविष्यात कधीही या केंद्रावर कॉपी चालणार नाही असे प्राचार्य शहारे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
कॉपी करू दिली नाही म्हणून सोशल मीडियावर बदनामी
By admin | Updated: March 19, 2017 00:36 IST