गोंदिया : नागरिकांची अनास्था, वाढती वृक्षतोड व औद्योगिकरणाचा विपरीत परिणाम विविध पक्ष्यांवर होत असून विदर्भातील ४१५ पैकी ३५ जातींचे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास लवकरच हे पक्षी डायनासोरप्रमाणे केवळ चित्रातच बघायला मिळतील, अशी भिती पक्षितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.अतिसंवेदनशील वर्गात मोडणाऱ्या पक्षांच्या संवर्धनासाठी नागरिक व पक्षिमित्रांच्या साहाय्याने वनविभागाने जनजागृती करून विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे. कुठले पक्षी घराच्या आश्रमाला आले तर त्यांना पळवू नका. अन्नाचे दोन घास किंवा मूठभर धान्य टाका, नामशेष होण्याऱ्या या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्या. त्यांनाही मनुष्याच्या मदतीच्या ऊबेची गरज आहे, असे आवाहन पक्षितज्ज्ञांनी केले आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे जागतिक उष्माघाताची समस्या जगापुढे उभी ठाकली आहे. त्याचा परिणाम एकंदरीतच ऋतुचक्रावर होत आहे. तिन्ही ऋतंूची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या कालावधीमध्येही बदल होत आहे. सामान्यत: विदर्भात आढळणारे चिमणी, कबूतर, साळुंखी आणि स्थलांतरित भोरड्याच्या जीवनक्रमावर याचा परिणाम होत आहे. साधारणपणे मार्च ते जुलै हा पक्ष्यांच्या विणीचा काळ असतो. मात्र निसर्गातील बदल आणि मनुष्याच्या अतिक्रमणामुळे या पक्ष्यांची प्रजनन प्रक्रिया प्रभावित होत असल्याने नव्या पक्ष्यांच्या उत्पन्नावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विदर्भात पूर्वी मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या गिधाड, सारस, माळढोक, रानपिंगळा, हिरवामुनिया आणि स्थलांतरित पाणपक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. निसर्गाचा सफाई करणारा अशी भूमिका बजाविणाऱ्या गिधाडाच्या तीन जाती विदर्भात आढळत होत्या. परंतु अन्नसाखळीमध्ये आलेला अडथळा, शिकार, विषप्रयोगामुळे त्यांची संख्या रोडावली आहे. जगभरात त्यांची संख्या चार कोटींवर होती. ती आता ५० हजारापेक्षाही खाली असल्याचे एका सर्वेक्षणावरून सिध्द झाले आहे. म्हातारी जनावरे विकल्या जात असल्यामुळे पक्ष्यांना मास मिळेनासे झाले आहे. दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत आहे. यामुळे तापमानातही वाढ होत आहे. याचा परिणामही पक्ष्यांच्या जीवनावर होत आहे. त्यामुळे अनेक पक्षी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. या पक्ष्यांच्या संवर्धन व संरक्षणाची आता गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
पर्यावरण असंतुलनामुळे पक्ष्यांच्या संख्येत घट
By admin | Updated: June 25, 2014 00:31 IST