कारंजा (घाडगे) : येथील ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या राजणी येथील तारा सीताराम ढोले या ५० वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे माझ्या आईचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलगा हेमराज ढोले याने केला. यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गर्दी पांगविण्याकरिता पोलिसांना पाचारण करण्यात आले. वर्धेतील डॉक्टरांच्या चमूने महिलेचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी मृतावस्थेत महिलेवर ज्या डॉक्टरांनी उपचार केले त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मृतक महिलेच्या मुलाच्या म्हणण्यानुसार २६ आॅक्टोबर रोजी रात्री १ वाजताच्या दरम्यान छातीत दुखत असल्याने ताराबाई ढोले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णावर उपचार करून गोळ्या व काही औषधी दिली. सकाळी ७.४० वाजताच्या दरम्यान सदर महिला शौचालयाकरिता जाण्याकरिता निघाली. शौचालयाच्या मार्गात पाणी साचुन होते. त्यावर पायघसरल्याने ती खाली पडली. यावेळी कोणीही कर्मचारी हजर नसल्याचा आरोप मृतकाच्या मुलाने केला आहे. यावेळी वॉर्डात असलेल्या रुग्णांनी सदर महिलेला उचलुन खाटेवर टाकले. याची माहिती वैद्यकीय अधिकारी शकील अहमद यांना मिळाली. त्यांनी तिला सलाईन चढवली; परंतु त्यावेळी माझ्या आईचा मृत्यू झाला होता, असे हेमराजचे म्हणणे आहे. डॉक्टरांनी मृतकावर उपचार केला. यामुळे नातेवाईकांनी जोपर्यंत संबंधीत डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली होती. तसेच नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकीत्सकाकडे लेखी तक्रार पाठविली व भ्रमणध्वनीवर संपर्क साधून घटनास्थळाला भेट देण्याची मागणी केली. शिवाय रुग्णाचे शवविच्छेदन बाहेरील डॉक्टरांनी करावे, अशी मागणी केली. यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. हा तणाव हाताळण्याकरिता पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. दुसरीकडे मृतकाच्या मुलाने संबंधीत डॉक्टरवर कारवाई करावी अशी तक्रार कारंजा पोलिसात दिली आहे. कारंजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील कारवाई शवविच्छेदन अहवालानुसार करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे लागले आहे.(शहर प्रतिनिधी)
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू; आरोप
By admin | Updated: October 27, 2014 22:41 IST